जेजुरी प्रतिनिधी- दि .(१३)आज जेजूरी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे डिजिटल पद्धतीने अनावरण जेष्ठ नेते शरदचंद्र पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मराठ्यांच्या इतिहासात आपल्या कार्यकर्तृत्त्वाने अनेक स्त्रिया अजरामर झाल्या. यामध्ये प्रामुख्याने राजमाता जिजाऊ माँसाहेब, रणरागिणी ताराबाई महाराणीसाहेब व पुण्यश्लोक अहिल्याबाई राणीसाहेब यांचा समावेश होतो.
पूर्वीच्या काळात स्त्रियांचा दर्जा पुरूषांच्या बरोबरीचा होता. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने वावरत असत. स्त्रियांना आपले बौध्दिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध करण्यासाठी शिक्षणाची संधी उपलब्ध होती. मातृसत्ताक व्यवस्था अस्तित्वात होती. परंतु नंतरच्या काळात ही उज्ज्वल व अभिमानास्पद असलेली परंपरा खंडीत झाली. हि खंडीत झालेली परंपरा आपल्या कर्तृत्त्वाने पुनर्जिवीत करण्याचं महान कार्य राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी केलं. आणि हिच परंपरा पुढे चालवण्याचं काम रणरागिणी महाराणी ताराबाई साहेब व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलं.
अहिल्याबाई राणीसाहेब या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांंच्या धार्मिकतेच्या व दानशूरतेच्या खुणा संपूर्ण देशभरात आपल्याला आजही पहायला मिळतात. भारतात कोणत्याही प्रमुख तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण गेलो तर तिथे अहिल्याबाईंनी उभी केलेली एकतरी वास्तू दिसणारच. देशाच्या वेगवेगळ्या भागांत असणाऱ्या मंदिरांचा त्यांनी जिर्णोद्धार केला, काही ठिकाणी नवीन मंदिरांची उभारणी केली. या मंदिरांची व्यवस्था राखण्यासाठी त्यांना वर्षासने लावून दिली. इतकेच नव्हे तर या धार्मिक स्थळांना, तीर्थक्षेत्रांना भेटी देणाऱ्या यात्रेकरूंना देखील त्यांनी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. देशाच्या विविध भागांतील यात्रेकरू एका भागातून दुसऱ्या भागात तीर्थयात्रांसाठी मोठ्या प्रमाणात जाऊ लागले.
विविधतेत एकता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून लोक तीर्थयात्रांसाठी प्रवास करू लागल्यामुळे एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण होऊ लागली. एकप्रकारे सांस्कृतिक एकोपा निर्माण झाला व देशाच्या एकतेची व अखंडत्वाची भावना लोकांच्यात निर्माण झाली.
परकीय आक्रमणांमध्ये उध्वस्त झालेल्या आपल्या सांस्कृतिक परंपरांची पुनर्बांधणी करून अहिल्याबाई राणीसाहेबांनी मोठं देशकार्य केलं आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी देखील हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आपली संस्कृती हि देशाच्या एकतेचा पाया आहे. या संस्कृतीचे जतन करून हा पाया आपण भक्कम केला पाहिजे.
तीर्थक्षेत्रांबरोबरच इतर पर्यटनवाढीस चालना दिली पाहिजे. त्यासाठी मूलभूत सोयीसुविधा निर्माण केल्या पाहिजेत. तरच सांस्कृतिक आदानप्रदान होत राहिल. एकतेची भावना टिकून राहिल. रोजगार निर्मिती होऊन अर्थव्यवस्था भक्कम होईल.
आज याठिकाणी बहुजन समाजाचा मोठा घटक असलेला धनगर समाज देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता. अहिल्याबाई होळकर धनगर समाजाबरोबरच बहुजन समाजाचे श्रद्धास्थान आहेत.
इंदूरच्या तुकोजीराव होळकर महाराजांचे पुत्र यशवंतराव यांच्याशी आपल्या जनक घराण्यातील बहिणीचा विवाह करून देऊन , राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी मराठा-धनगर समाजात आंतरजातीय नातेसंबंध स्थापित केले. जातीव्यवस्था मोडून काढण्याची सुरूवात महाराजांनी अशाप्रकारे स्वतःपासून केली होती.
धनगर समाजावर शाहू महाराजांचा विशेष लोभ होता. महाराज राधानगरी भागात शिकारीला गेले असताना दाट जंगलात महाराजांच्या समोर अचानक एक अस्वल आले. महाराजांच्यावर त्यावेळी बिकट प्रसंग ओढवला होता, पण जंगलात मध काढण्यास आलेल्या एका धनगर व्यक्तीने प्रसांगावधान राखून छत्रपतींचा जीव वाचवला होता. महाराजांनी त्याला काय इनाम पाहिजे विचारले तेव्हा त्याने काहीही मागितले नाही. छत्रपतींनी आपल्या झोपडीस पाय लावून आपल्या घरची आंबिल भाकरी खावी इतकाच आग्रह धरला. महाराज खूशीने त्याच्या घरी गेले. त्याच्या घरची आंबिल भाकरी खाल्ली. छत्रपतींचा जीव वाचवल्याबद्दल तो काहीही मागू शकला असता मात्र त्याचा प्रामाणिकपणा व निस्वार्थी भावना पाहून महाराजांनी तो राहत असलेला आख्खा डोंगर त्याच्या नावे करून दिला.
शरीराने बलदंड व मनाने निस्वार्थी, प्रामाणिक व प्रेमळ असलेल्या या समाजावर शाहू महाराजांचा व संपूर्ण छत्रपती घराण्याचा पूर्ण विश्वास होता व आजही आहे.
हल्ली हा समाज त्यांच्या हक्कांपासून वंचित राहत आहे. जुन्या काळातल्या काही चुकांच्यामूळे “धनगर” चे “धनगड” झाल्यामुळे आज हा समाज त्यांच्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहत आहे. या चुका सुधारून या समाजाला त्यांचा हक्क मिळवून देणे, धनगर समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण देणं हि सरकारची जबाबदारी आहे. छत्रपती शाहू महाराजांचा वंशज म्हणून मीदेखील या समाजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणं हे मी माझं कर्तव्य समजतो. असे ही यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी नमूद केले.