ब्रेकिंग न्यूज राज्यातील प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सकारात्मक – मा.उदय सामंत यांची माहिती
सोलापूर प्रतिनिधी : राज्यातील 42 लाख विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी साडेतीन लाख प्राध्यापक आहेत. साडेपाच हजार महाविद्यालयांबरोबरच अनेक विद्यापीठांमधील प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून रिक्तपदांची माहिती संकलित केली जात आहे.
🎯 आगामी काळात लवकरच त्यासंदर्भात मोठा निर्णय होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सोलापुरात दिली.
🎯ऑनलाइन परीक्षेतील तक्रारींसाठी स्वतंत्र समिती
कोरोनामुळे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घ्यावी लागली. त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी ऑनलाइन सर्व्हर हॅक झाल्याबद्दल सायबर सेलकडे तक्रार देणार असल्याचे सांगितले.
🎯 त्यांनी तक्रार न देताच परीक्षा घेतल्या. मुंबई विद्यापीठाने सायबर सेलकडे तक्रार दिली असून त्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, त्यावेळी ज्या-ज्या विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षेसंदर्भात तक्रारी नोंदविल्या आणि त्यांनी पुढे काय कार्यवाही केली, याच्या पडताळणीसाठी फॅक्ट फाईंडिंग समिती नियुक्त केली आहे. त्यात उपसचिव, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक, आयटीचे सचिव आणि सायबर तज्ज्ञांचा समावेश असून तक्रारीनंतरही काहीच न करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
🎯महाविद्यालयांमधील प्राध्यापकांबरोबरच काही महाविद्यालयांमधील प्राचार्यांची पदे रिक्त होती. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील 260 प्राचार्यांच्या भरतीस राज्य सरकारने मंजुरी दिली असून त्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. तर विविध विद्यापीठांमधील 48 संविधानिक पदभरतीलाही मान्यता दिल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठातील एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
🎯आता प्रत्येक विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र सुरु करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात ‘युपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचाही निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या मागणीनुसार सोलापुरातही हे केंद्र लवकरच सुरु होईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
🎯विद्यापीठाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बदलीचा विचार
राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करता येतील का, यादृष्टीने सरकारचे नियोजन सुरु आहे. तत्पूर्वी, कोंडवाना विद्यापीठ, नागपूर, रामटेक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी त्यासंदर्भात निवेदने दिली आहेत. आता नांदेड येथील कर्मचाऱ्यांची काय भूमिका आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. त्यानंतर सर्वच विद्यापीठांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करुन कर्मचाऱ्यांच्या बहुमतानुसार अंतर्गत बदल्याचा निर्णय आगामी शैक्षणिक वर्षात घेतला जाईल, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.