विशेष प्रतिनिधी: नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडील खात्यांमध्ये फेरबदलाचे संकेत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री नितीन राऊत यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळे काँग्रेस हायकमांडकडून राज्यात खांदेपालट केली जाण्याची शक्यता आहे. तसेच महत्त्वाची बातमी म्हणजे नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. तर नितीन राऊतांचं खातं पटोलेंकडे जाण्याची शक्यता आहे. याबाबत राहुल गांधींसोबत राऊत, पटोलेंची चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे.
यावेळी नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत म्हटले की, मंत्रीपद देण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींचा आहे. खुर्ची मिळाली तर न्याय देण्याचा माझा स्वभाव आहे. पक्षात लोकशाही असल्यानं नितीन राऊत आणि मी भेटलो आहे.
दरम्यान, नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडींनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाना पटोले यांच्या अध्यक्षपदाबरोबरच 6 नवे कार्यकारी अध्यक्ष पक्षाने राज्यात नेमणूक केली आहे.
महाविकासआघाडी सरकारमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद शिवसेना स्वत:कडे ठेवून काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला ऑफर करण्यात आलं. त्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला ऑफर केल्याची माहिती आहे.
आक्रमक आणि काँग्रेसमधील विदर्भातील दलित चेहरा असलेले नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्रिपद मिळू शकतं. तर नाना पटोले यांना नितीन राऊत यांचं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेक नेते इच्छूक असले तरी नितीन राऊत यांना पद मिळण्याची शक्यता आहे.