पुणे दि. 9 – दैनिक महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार दीपक दळवी यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या नीती आयोगाच्या अधिपत्त्याखाली चालणाऱया ग्लोबल ट्रायम्फ वर्च्युअल युनिव्हर्सिटीच्या वतीने ही पदवी पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल प्रदान करण्यात आली आहे.
दीपक दळवी हे ठाणे येथून प्रसिद्ध होणाऱया दै. महाराष्ट्र जनमुद्रा या वृत्तपत्राचे संपादक आहेत. परंतु एवढीच त्यांची ओळख मर्यादित नसून ते सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दलही ओळखले जातात. शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केला. पण लहानपणापासून त्यांना नाटकात कामे करण्याची, लेखनाची प्रचंड आवड होती. तांत्रिक शिक्षण घेतल्यावर काही वर्षे एका खासगी कंपनीत क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर म्हणून नोकरी केली. पण नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते.
श्री. दळवी यांना लेखनाची आवड असल्यामुळे त्यांचे विविध वृत्तपत्रांतून लेखन प्रसिद्ध होत असे. शेवटी आपल्या आवडीनुसार पूर्णवेळ पत्रकारिता करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 1995 साली नोकरी सोडून त्यांनी `गावकरी’ वृत्तपत्रात ठाणे आवृत्ती प्रमुख काम सुरू केले. तिथे 3 वर्षे काम केल्यावर लोकसत्तात सांस्कृतिक विषयक लेखन केले. विशेषत: नृत्य, नाट्य, चित्रपट आदींविषयी भरपूर लेखन केले.
पुढे 2000 साली काही मित्रांसोबत दळवींनी दै. महाराष्ट्र जनमुद्रा हे वृत्तपत्र सुरु केले. मात्र जून 2003 पासून या वृत्तपत्राची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. तेव्हापासून ते पूर्णवेळ या वृत्तपत्राच्या संपादनाकडे, निर्मिती, वितरणाकडे लक्ष देत आहेत. आज या वृत्तपत्राने स्वत:चे एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. त्यांना काही मोठ्या वृत्तपत्रांकडून विचारणा झाली. पण त्यांनी निष्ठेने, जिद्दीने स्वत:चे वृत्तपत्र चालविले आहे.
वृत्तपत्र संपादनाबरोबरच दळवींनी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे, तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाची, कार्याची, साहित्याची ओळख जगाला व्हावी. म्हणून 2010 पासून ते स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन करित आहेत. पहिले संमेलन 2010 साली मॉरिशस, दुसरे 2012 साली दुबई, 2013 ला लंडनमध्ये झाले तर चौथे संमेलन 2017 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झाले. 28 मे रोजी स्वातंत्र्यवीरांची जयंती असते, त्या दरम्यान हे संमेलन होते.
या संमेलनांची कल्पना कशी सुचली? असे विचाल्यावर दळवी म्हणाले, मॉरिशसमध्ये 2003 साली एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गेलो असताना, तेथील लोकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काहीच माहिती नसल्याचे आढळून आले आणि मला धक्काच बसला. गुगलवर जी माहिती दिल्या गेली होती, ती ही अत्यंत चुकीची होती. पुढे गुगलशी पत्रव्यवहार करून ती दुरुस्त करून घेतली. पण सावरकरांचे साहित्य, विचार, कार्य जगातील मराठी माणसांपुढे प्रभावीवणे पोहचावे म्हणून संमेलनाची कल्पना सूचली.
या संमेलनाच्या माध्यमातून केवळ स्वातंत्र्यवीरांचीच माहिती दिली जाते, असे नव्हे तर एकंदरितच मराठी भाषा, संस्कृती, इतिहास, भूगोल, समाजजीवन याची ओळख परदेशातील मराठी जनांना आणि विशेषत: त्यांच्या मुलामुलींना होते. या संमेलनांमुळे तेथील मराठी जनांची सांस्कृतिक भूक भागविली जाते. या संमेलनाचा परिणाम म्हणून मॉरिशसमध्ये मराठी भाषेचे वर्ग सुरू झाले, तर काही पालकांनी आपल्या मुलामुलींची नावे मराठीत ठेवायला सुरुवात केली. या संमेलनांमध्ये स्थानिक मराठी जनांप्रमाणे त्या त्या देशातील इतरही नागरिक सहभागी होऊन मराठी भाषा, इतिहास, संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करतात, हे विशेष. या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राची ओळख परदेशस्थ नागरिकांना होत आहे, हे दीपक दळवी अभिमानाने सांगतात.
या संमेलनांच्या आयोजनामध्ये स्थानिक महाराष्ट्र मंडळांचाही सहभाग असतो. त्यांनाही एक व्यासपीठ निर्माण होते. शिवाय त्यांच्या सहभागामुळे आयोजनातही मोठा हातभार लागतो.
पत्रकारितेबरोबरच दीपक दळवी गेली 30 वर्षे युवक बिरादरी या सामाजिक चळवळीतही सक्रिय आहेत. युवकांच्या संघटनातून ते पाणी वाचवा, साक्षरता अभियानात, स्वच्छता मोहिम, पृथ्वी वाचवा, भारत जोडो अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. यासाठी त्यांनी पूर्ण देश पिंजून काढला आहे. तर पर्यटनाच्या आवडीतून मॉरिशस, दुबई, थायलंड, इंग्लंड, स्विझर्लंड, फ्रान्स, इटाली, नेदरलँड, व्हॅटिकन सिटी, जर्मनी, हॉलंड, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांना भेटी दिल्या आहेत.
पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी हा दळवी यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पत्रकारितेत 25 हून अधिक वर्ष कार्यरत असताना सामाजिक भान ठेवून वाटचाल करत असल्यानेच त्यांना डॉक्टरेट या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या सन्मानाबद्दल विविध सामाजिक,राजकीय,पत्रकारिता ,उद्योग,सहकार या क्षेत्रासह मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स सोसायटीचे मा.संदेश जी जाधव यांनी ही त्यांचे विशेष अभिनंदन केले