राज्यातील होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासनामार्फत 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसंच स्टार्टअप्सना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरीताही 2 लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य मिळणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे या योजनांचा शुभारंभ करण्यात आला.
‘महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण भागात प्रचंड बुद्धिमत्ता असलेले युवक असून या हिऱ्यांना पैलू पडण्याचे काम कौशल्य विकास विभागाने हाती घ्यावे. ज्यांना नवीन काही करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना साधन, संपत्ती आणि मार्गदर्शन देऊन जगासमोर आणावं,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं आहे.
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत या दोन्ही योजना राबवण्यात येणार असून आज त्यांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विभागाचे मंत्री नवाब मलिक, क्रिडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार, कौशल्य विकास राज्यमंत्री शंभूराज देसाई, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सहअध्यक्ष जेष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्य विकास विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या दोन नवीन योजनांचा शुभारंभ म्हणजे नव्या युगाची सुरुवात असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे व्हा असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत असत. त्यासाठी राज्यात छोटेछोटे उद्योग सुरू करणे गरजेचे असून या माध्यमातूनच राज्यात उद्योग क्षेत्रात मोठे काम होणार आहे. आजच्या कार्यक्रमातून आपण बाळासाहेबांचे स्वप्न प्रत्यक्षात आणत असल्याने आनंद होत आहे. ग्रामीण भागात विविध उद्योगांसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. हे लक्षात घेऊन विभागाने काम करावे. यासंदर्भातील सरकारच्या योजनांची अंमलबजावणी वेगाने करून राज्यात समृद्धी आणावी, उत्पादनाचा दर्जा चांगला राखताना उत्पादीत मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ संशोधनावरही भर देण्यात यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.