वारंवार प्रयत्न करूनही लग्न जमत नाही, या नैराश्यातून नागठाणे (ता. सातारा) येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश सूर्याजी मगर (वय 44) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. योगेशचे नागठाणे बाजारपेठेत टेलरिंगचे दुकान आहे. योगेश व त्याची आई हे दोघे नागठाणे येथे वास्तव्यास होते. योगेश रोज रात्री भाड्याने घेतलेल्या गाळ्यात झोपायला जात होता.
शनिवारी सकाळी योगेश घरी आला नसल्याने त्याची आई दुकानात गेली. दुकान आतून बंद होते. त्यावेळी आईने शेजारच्या लोकांच्या मदतीने दुकानाचे दार ढकलून उघडले. त्यावेळी दुकानात योगेश गळफास लावलेल्या मृतावस्थेत आढळून आला.
योगेश एकुलता एक असल्याने त्याने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. फिर्याद चंद्रकांत रघुनाथ साळुंखे (रा. नागठाणे) यांनी बोरगाव पोलिसांत दिली आहे.