दीडशे वर्षा नंतर तरी….
मिस्टर गांधी उत्तर दया
गांधी खर म्हणजे बापू म्हणायला हव होत किंवा महात्मा पण तरी मी मुद्दाम गांधी म्हणतो आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारतो आहे.
तुमच्या बद्दल इतके बोलल जात आहे रोज हे तुम्हाला माहीत आहे का ? म्हणजे चांगल वाइट अस दोन्हीही बाजूने बोलल जात … यातल खर काय आहे हो गांधी ?
सगळ्यात जास्त तुमच्यावर श्रद्धा असणारे खुप आहेत, तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणारे ही बहुसंख्य आहेत.
पण मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस कसा वाइट होता, किती नुकसान केल आहे देशाच, अगदी देशद्रोही होता अस बोलणाऱ्याची संख्या आता कमी नाही. गंमत म्हणजे यातल्या बहुतेकानी तुम्ही लिहलेली एकहि ओळ वाचलेली नाही. तुम्ही देशद्रोही आहात का गांधी ?
तुमच चरित्र वाइट होत अस म्हणणा-यांनी तुमच एकही चरित्र वाचलेल नाही.
दूसरीकड़े तुमच्या काही भक्तानि तुम्हाला पोथित बंद केल आहे. तुम्ही परिवर्तन स्विकारणारे म्हणून प्रसिद्ध. पण, तुमच्याच भक्तानि तुम्हाला अपरिवर्तनीय करुन टाकल आहे. भक्त आणखी काय करतात. तुम्ही नेमके कसे होतात गांधी ?
तुमच नाव अजूनही चलनी नाण आहे हे तुम्हाला माहीत आहे का गांधी ? फक्त राजकारणातच नाही तर व्यवहारात सुद्धा आम्ही चलनाला गांधी हा पर्यायी शब्द वापरतो. म्हणून तुम्हाला सतत खिशात ठेवतो आम्ही… हे नेमके काय आहे ?
मजबूरी का नाम महात्मा गांधी हे लहान पणापासून ऐकतो आहे ह्याचा नेमका अर्थ काय आहे हो गांधी ?तुम्ही तरी सांगा.
तुमची किती चेष्टा केली जाते हे तुम्हाला माहीत नसेल… किती-किती नावाने तुम्हाला संबोधित केल जात हे तुम्हाला माहितही नसेल… तुम्ही चेष्टा आणि कुचेष्टाचा विषय आहातच पण अनेकांच्या द्वेषाचा देखील विषय आहात…
तुम्ही काय काय चुका आणि पाप केली ते तुम्हीच लिहुन ठेवल आहे पण, गांधी तुम्हाला माहीत नसलेली अनेक पाप तुमच्या माथ्यावर आम्ही मारून ठेवली आहेत…. तुम्हाला ही पाप माहीत आहेत का ?
तुम्ही सतत राम नाम जपायचे, अभंग आणि प्रार्थना म्हणायचे म्हणून इथल्या मुस्लिमांनी तुमच्याकड़े सतत संशयाने पाहिल. पण, म्हणून हिंदु तुम्हाला आपल मानतात ह्या भ्रमात राहु नका… तुम्ही नेमके कोणाचे होतात हा संशय अजूनही दोघाना आहे… म्हणजे तुम्ही माणूस होतात आणि माणुसकीवर प्रेम करत होतात ह्या वर दोघांचा विश्वास नाही. मग तुम्ही नेमके कोणत्या धर्माचे आहात गांधी ?
आइनस्टाइन म्हणाला ते खर वाटत की तुम्ही हाडामासाचे माणूस होतात… ह्या वर येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत. त्याच हे भाकित आम्ही खर ठरवल आहे… तुम्ही नेमके कोण होतात हे सांगा गांधी ?
तुम्हाला मारणाऱ्या त्या थोर अमानावाचे पुतळे उभारले तर तुम्हाला नवल वाटायला नको… ही तुम्हाला सूचना आहे धमकी समजा हवतर.. तुमच्या सत्याग्रह किंवा उपोषण असल्या फ़ालतू गोष्टीना आता काही किंमत नाही हे तुम्हाला माहीत आहे ना ?
मला कळत नाही की गांधी तुमचा खून केला, तरी तुम्ही संपायला तैयार नाही. आम्ही तुम्हाला खुप बदनाम केल तरी तुम्ही त्याला पुरुन उरलात …आम्ही देशातच तुम्हाला खुप बदनाम केल पण तरी सगळ जग तुमच्या समोर कस नतमस्तक कस होत हो ?
आम्हाला आमची ओळख सांगण्यासाठी १५ लाखाचा सूट घालावा लागतो ..आणि तुम्ही फक्त एका वस्त्रानिशी काश्मीर ते कन्याकुमारी कसे फिरत होतात ..मिस्टर गांधी ?
जगात कोणीही असो भारत म्हणजे गांधीचा देश अस कस म्हणतात हो ?
गांधी तुमचा विचार मान्य नसलेली माणस देखील तुमच्या समोर कशी झुकतात हो ?
इतके सगळे शोध लागून प्रगती होऊन प्रचंड विकास होऊंन देखील शेवटी सगळे विद्वान तुमच्या जुनाट विचारा जवळ येऊन का थांबतात ?
जगाला तुमचाच विचार वाचवेल अस सतत जगाला का वाटत ?
तुमच्याशी वैचारिक मतभेद असणारी विचारधारा तुमच्या पुढे नतमस्तक का होते ?
डावे म्हणतात की तुम्हाला काही कळत नाही तुम्ही गोंधळलेले होतात ?
उजवे म्हणतात की तुम्हाला इतर धर्माविषयी प्रेम होत ?
यातल खर काय ?
तुम्ही नेहमी सत्य बोलायचे अस म्हणतात ते खर आहे का हो ? कारण दिवसभरात आम्ही इतके असत्य बोलतो की कुणी खर बोलत हेच खोट वाटत .
मला खरच कळत नाही गांधी मी कोणावर विश्वास ठेउ … या सोशल मेडियाच्या जगात तर तुम्ही इतके बदनाम आहात … कितीतरी माणस तुमच्या वर इतकी तूटुन पडतात की वर्षानुवर्ष तुम्ही त्यांच्या वर केलेल्या अन्याया विरुद्ध त्यानी रणशिंग फुंकल आहे अस वाटत… सोशल मीडिया म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का गांधी ?
मी खुप सामान्य आहे निति नैतिकता या मार्गा वरुन मला चालता येत नाही. भ्रष्टमार्ग स्विकारल्या शिवाय मला उदरनिर्वाह करता येत नाही . पण, मग तरी मी तुम्हाला जाब विचारतो आहे. बोला उत्तर दया बोला
गांधी. अस प्रेमाने आणि करुणेने नका बघू माझ्याकड़े मला नाही सहन होत ते… इतके क्षमाशील असण बर नाही गांधी…
द्विराष्ट्र वादाचा सिद्धांत मांडणा-यांची आज पूजा केली जातेय. आणि तुम्हांला फाळणीचा गुन्हेगार ठरवला जातंय गांधी… न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा हा देश तुम्हाला देताना तुम्हाला यातना नाही का होत मिस्टर गांधी ?
इतके सगळ सहन करून तुम्ही सतत इतके हसतमुख हे सगळा बघून तुम्हाला यातना नाही का होत ? कि कालच ओघात तुम्ही सुद्धा बदललात ?
कसे असता हो तुम्ही ….
तुमची हत्या करणा-या नथूरामाला आदर्श मानणारे आज सकाळीच स्वताला साबरमतीचे संत म्हणत तुमच्या पुतळ्याला हार घालून आले. हे तुम्ही पाहील असेलच.
मिस्टर गांधी तुम्ही कसे काय इतके सहनशील आहात हो. नथुरामाने तीन वेळा तुमच्यावर हल्ला केला. पण, तीनही वेळेला मोठ्या मनाने तुम्ही त्याला माफ केलत. त्याच नथूरामाने अखेरीस तुमचा जीव घेतला. तुम्ही अजून इतके सहनशील, सोशीक, क्षमाशील आहात का ? कारण आतातर केवळ गोमांस घरी ठेवल या संशयावरून ज्या घरातील एक मुलगा सैन्य दलात देशाची सेवा करतोय त्याच्या बापालाच ठेचून ठार मारलं जातंय. तुम्हांला वाटत नाही का ? तुमची सोशीकता हा देश विसरला आहे. मिस्टर गांधी मला उत्तर द्या.
कि 150 वर्षात इथल्या मुर्दडांच्या प्रमाणे तुमच्या हि संवेदना बोथट झाल्यात ..बोल मिस्टर गांधी..आज हे प्रश्न तुम्हाला माझासारखे तरुण विचारणार आणि तुम्हाला उत्तर द्यावा लागेल, की तुम्हाला ठाऊक आहे करुणा आणि अंहिसा हेच शाश्वत सत्य आहे … बोला गांधी
मिस्टर गांधी उत्तर दया…
तुम्हांला गोळ्या मारणा-या नथूरामाला तुम्ही खरच माफ केलत का ओ ! भेटला का कधी तुम्हांला तो. तुम्हांला अहो जा हो करावस वाटत पण, त्याच नावही तोंडात घ्यावसे वाटत नाही. कायद्याने ज्याला खुनाच्या आरोपाखाली फाशी दिली, त्या खुनाचे उदात्तीकरण करणारी नाटक आता महाराष्ट्रात सुरु आहेत. हे नाटक बघायला समोर बसलेल्या प्रेक्षकवर्गावर अशी काही मोहिनी घातली जाते की, नाटकामध्ये एक क्षण असा येतो की, नथुराम जेव्हा तुमच्यावर गोळ्या झाडतो तेव्हा संपूर्ण प्रेक्षकवर्ग हा उठून टाळ्या वाजवायला लागतो. होय मिस्टर गांधी हे तुमच्याच देशात घडतंय…
तुम्हांला मारलेल्या बंदुकीतल्या गोळ्या अजूनही संपलेल्या नाहीत. विरोधी विचार ऐकूनच घ्यायचे नाही हे सूत्र आजही भारतात चालू आहे. तुम्हांला गोळ्या घालताना जसे त्यांचे हात कापले नाहीत…. आज पण … रिव्हॉल्वरही तेच आणि भेजाही तोच काही बदललेले नाही.
टिप : एक गोष्ट तितकीच सत्य आहे. हे कोणाला पटो अगर न-पटो मिस्टर गांधी… तुमच्या मारेक-यांवरती मनापासून प्रेम करणा-यांना हे कळून चुकले आहे. कि हा देश नथुरामाचा नाही… तर गांधींच्याच नावाने ओळखला जातो. त्यामुळे जगभरात फिरताना त्यांना फक्त एकच माल विकायला मिळतो. त्या मालाच नाव आजही मोहनदास करमचंद गांधी आहे.
– डॉ. जितेंद्र आव्हाड