पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव सुळेवाडी घाटात काही दिवसापूर्वी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणारी टोळी पोलिसांनी जलद गतीने पकडली आहे.यातील फिर्यादी जिवराज सुभाष कदम (वय 44, एसटी चालक, रा. पांढरवाडी, पो. विसापूर, ता. खटाव, जि. सातारा) हे कोरेगाव बसस्थानक येथून सातारा ते सोलापूर अशी एमएच 06 एच 8971 ही कोरेगाव आगाराची एस टी बस घेऊन जात होते.ही बस यातील चालक व वाहक यांनी 19 जानेवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास म्हसवड बस स्थानक येथे आणली.त्या वेळी बसमधील सर्व प्रवासी म्हसवड स्थानकामध्येच उतरले होते.त्यानंतर एस टी बस पिलीव मार्गे सोलापूरकडे निघाली असताना रात्री साडेदहाच्या सुमारास माळशिरस तालुक्यातील पिलीव नजीक असलेल्या सुळेवाडी घाटामध्ये आली.या वेळी घाटामध्ये अज्ञात 20 ते 22 वर्षे वय असलेल्या चारजणांनी एसटी बसवर बस लुटण्याच्या उद्देशाने दगडफेक करून बसच्या समोरील काचा फोडल्या व एस टी बस लुटण्याचा प्रयत्न केला.एस टी चे अंदाजे 20 हजार रुपयांचे नुकसान केले.
तसेच तेथून जाणाऱ्या दुचाकीस्वारास लुटण्याच्या उद्देशाने दगड मारून जखमी केले.याबाबत फिर्याद दाखल झाल्याने माळशिरस पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता.याचा तपास पिलीव औट पोस्टचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके हे करीत होते.गुन्ह्याचा तपास करण्यासाठी शेळके यांनी आपल्या टीमसह आटपाडी, म्हसवड, नातेपुते, वेळापूर, पंढरपूर या सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अनेक गावांमध्ये गोपनीय माहिती संकलित केल्यानंतर खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा देवापूर ता. माण, जि. सातारा व आटपाडी, जि. सांगली येथील संशयित आरोपींनी संयुक्तपणे केला आहे.माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची गती वाढवून यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके यांच्या तपास पथकाने म्हसवड पोलिस ठाणे हद्दीतील म्हसवड, हिंगणी, धुळदेव, देवापूर, पळसावडे या भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले.तसेच राजेवाडी, हिंगणी, देवापूर परिसरातील सर्व वीटभट्ट्यांवर वेषांतर करून तेथील कामगार व परिसरातील ऊसतोड कामगारांकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती मिळवली.त्यानंतर आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावाच्या परिसरात मासे खरेदी व्यापारी असल्याचे भासवून देवापूर, जि. माण व राजेवाडी, जि.सांगली येथे सापळा लावला व आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.या गुन्ह्यात एकूण आठ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे व विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्यांच्याबाबत ज्युवेनाईल जस्टिस ऍक्टप्रमाणे कार्यवाही केली असून सदर आरोपींकडून सांगली, सातारा जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी, घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. ही कामगीरी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके, पोलिस हेड कॉन्स्टेबल पंडित मिसाळ, पोलिस कॉन्स्टेबल दत्ता खरात, पोलिस कॉन्स्टेबल समाधान शेंडगे, पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ माने, पोलिस कॉन्स्टेबल सतीश धुमाळ, पोलिस कॉन्स्टेबल अन्वर आतार यांनी केली आहे.