डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याचा प्रचंड प्रभाव होता. बाबसाहेबांच्या मते गौतम बुद्ध हेच खऱ्या अर्थाने स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होते. भारतीय स्त्री मुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या समतावादी तत्ववादाच्या पायावर उभी आहे.*
*कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातील स्त्रियांच्या सशक्तीकरणा वरून करता येते. त्यामुळे समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करण्याची डॉ. बाबासाहेबांची आग्रही भुमिका होती. पुरुषांच्या बरोबरीनेच स्त्रियांची देखील शैक्षणिक प्रगती होणे अत्यावश्यक आहे हे समजून त्या काळपासूनच ते स्त्री शिक्षणासाठी आग्रही होते. ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून अस्पृश्यांसह कनिष्ठ मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्याबरोबरच महिलांना शिक्षण देण्यासही प्राधान्य दिले. औरंगाबादमध्ये त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून महाविद्यालयात मुलींनाही प्रवेश देऊन स्त्रियांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा पाया घातला. मुंबईमध्ये सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजासाठी सुरू केली. देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. उच्च शिक्षणाबरोबरच "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" चा नारा त्यांनी दिला.*
उच्च महाविद्यालयाबरोबरच दलित शिक्षण संस्थेची स्थापना करून दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली. दलित व गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे, शैक्षणिक साधनसामग्री पुरवून दलितांनी शिक्षण घेऊन शिक्षित होण्यासाठी प्रयत्न केला.
१९४२ साली नागपूर येथे अखिल भारतीय अस्पृश्य महिला परिषद घेऊन खाण कामगार स्त्रीयांना प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिण्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षाची सेवा झाल्यावर निवृत्ती वेतनाची तरतूद यांसारखे महत्वाचे निर्णय घेतले. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्री ला प्रसुती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्तिमत्त्व आहेत. भारतानंतर अनेक वर्षांनी इतर देशामध्ये महिलांना प्रसूती रजा मंजूर करण्याचे निर्णय झाले.
१९४७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे कायदेमंत्री असताना त्यांनी हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेमध्ये मांडला. प्रामुख्याने अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्न संबंधातील स्त्री पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काने लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्वांचा हिंदू कोड बिलामध्ये समावेश केला. भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती. समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. हिंदू कोड बिल हे स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी उचललेले एक धाडसी पाऊल होते. या क्रांतिकारक घटनेने स्त्रियांच्या जिवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री पुरुषांच्या दर्जात समानता प्रस्थापित झाली.
भारतातील स्त्रियांना भारतीय घटनेनुसार मतदानाचा अधिकार देण्याचे समानतेचे धोरण डॉ. बाबासाहेबांनी देऊन मतदानामध्ये महिलांना समान अधिकार दिला. तर युरोपसारख्या प्रगत देशामध्ये मतदानाच्या अधिकारासाठी स्त्रियांना संघर्ष करावा लागला.
समाजकारणामध्ये आणि आपल्या चळवळींमध्ये डॉ. बाबासाहेबांनी स्त्रियांना आवर्जून सहभागी करून करून घेतले. १९२७ ला महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३० चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह तसेच १९४२ च्या नागपुरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःही पुढे यायला हवे, आपले विचार मांडायला हवेत हा विचार आंबेडकरांनी मांडला.
“डॉ. बाबासाहेब- असामान्य आणि अफाट कर्तृत्व”
*डॉ. बाबसाहेबांच्या सामान्य कर्तृत्ववाला दिशा देण्याचे काम बडोदा संस्थानच्या तत्कालीन महाराज सयाजीराव गायकवाड यांनी केले. एक दलित म्हणून वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेणाऱ्या या मुलाची अफाट स्मरणशक्ती आणि शैक्षणिक उंची लक्षात घेऊन महाराजांनी परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊ केली. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक या शिक्षण संस्थांमध्ये अर्थशास्त्र विषयात पीएच डी मिळवली. कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाज सुधारक होते. ते भारताचे पहिले कायदेमंत्री राहिले. भारतीय पीडित, शोषित आणि दलितांचे प्रतिनिधी म्हणून लंडनच्या तीनही गोलमेज परिषदांना हजर राहिले. मजुरांना, कामगारांना हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आणि हिंदू धर्मात समतेची वागणूक देण्यासाठी मोठा लढा दिला. शेवटी हिंदू धर्म त्यागाचा म्हणजे धर्मांतराचा निर्णय घेतला. अखेर गौतम बुद्धांच्या मार्गदर्शक तत्वानुसार बौद्ध धर्माचा स्वीकार करून भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती साजरी केली. त्यामध्ये २०००० लोकांनी सहभाग घेतला होता. बाबासाहेबांच्या दीड ते दोन लक्ष अस्पृश्य अनुयानांनी बौध्द धर्म स्वीकारला. या घटनेची जागतिक इतिहासात नोंद झाली. कारण ते जगातील सर्वांत मोठे सामूहिक धर्मांतर होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री असलेल्या बाबासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय संविधान लिहिले. सर्वांना समान हक्क अधिकार देण्याचा बाबासाहेबांच्या असामान्य बुद्धीची प्रचिती संविधानाच्या वाचनावरून आजही आपण घेत आहोत.*
*१४ एप्रिल डॉ. बाबासाहेबांची जयंती.*
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती.
प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग, मनुस्मृती चे दहन, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पीपल एज्युकेशन सोसायटी ची स्थापना, महाड सत्याग्रह, भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक अशी ओळख आपल्या सर्वांसमोर ठेवून गेलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. दलित म्हणून वर्गाबाहेर बसायला लागणाऱ्या या मुलाने दलितांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. शिक्षणाचे महत्व पटवून दिले. समानता दिली आणि “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” असा गुरुमंत्र दिला….
अशा असामान्य कर्तृत्वाच्या व्यक्तीमत्वाला त्रिवार वंदन !!!
डॉ. भारती चव्हाण
संस्थापक अध्यक्षा
मानिनी फौंडेशन