चांदापुरी प्रतिनिधी- रशीद शेख
आयुष्य सुंदर आहे ..रसिक आहे.. आस्वादी आहे. तरीही त्याची गुणवर्णनता शब्दात व्यक्त करता येत नाही. भारतीय इतिहासामध्ये अनेक गुणगौरविता व त्यांचे आदर्श स्विकारार्ह आहेत. भारतीय महिला संपूर्ण स्त्रीजगताचा आदर्श आहे .महाराष्ट्राच्या धार्मिक -शैक्षणिक -सांस्कृतिक -सामाजिक व राजकीय पटलावर स्त्रीशक्तीने असामान्य कार्य केले आहे .महाराष्ट्र सुस्थापित ,सुरक्षित आणि गौरवशाली बनविण्यासाठी शासन स्तरावर ज्या महिला पोलिस अधिकाऱ्यांनी जे योगदान दिले आहे ते निश्चितच स्पृहनीय आहे. खरे तर काही दशकांपूर्वी वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी हे पद काहीसे दुर्लक्षित समजले जात होते. कारण मुळातच हे क्षेत्र अतिशय आव्हानात्मक मानसिक संतुलनाची निडर पणाची कठोर परीक्षा घेणारे होते. त्यामुळे केंद्रीय स्तरावरील परीक्षेसाठी युवतीवर्ग अनुत्सुक असायचा . मात्र किरण बेदी यांनी आयपीएस परीक्षेमध्ये निर्विवाद यश मिळवून देशासाठी अत्यंत धाडसी कामगिरीचे सादरीकरण केले . आणि यूपीएससी परीक्षेतील स्पर्धकांसाठी युवापिढीच्या आयकॉन म्हणून स्वतःची ओळख सिद्ध केली. याच प्रेरणास्त्रोतातून अनेक महिला आयपीएस अधिकारी कार्य सिद्ध झाल्या. त्यातीलच अत्यंत कार्यक्षम पोलीस अधिकारी हे आदर्श डॅशिंग व्यक्तिमत्व काहीशा संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे त्यांचे नाव. शालेय विद्यार्थिनी महाविद्यालयीन युवती ते क्लासवन अधिकारी हा तेजस्वी मॅडमचा प्रवास काहीसा थक्क करणाराच आहे. सर्व सामान्य परिस्थितीतून त्यांनी जिद्दीने व अथक परिश्रमातून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत चे स्वयंभू पणे आरेखन केले खरे ! प्रेरणा मात्र आई- वडिलांची होती हे, त्रिकालाबाधित सत्य त्या प्रांजळपणे कबूल करतात. त्यांचे मूळ गाव शेवगाव ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर हे तसे काहीसे आडवळणी गाव .अगदी टिपिकल ग्रामीण परिसर काहीसा अप्रगतच घरी एकत्र कुटुंब पद्धती मग विचार भिन्नता असणे ही गैर नाही. शिक्षणाविषयी ही फारसे औत्स्तुक्य नव्हते .मोठ्या बहिणींची लग्ने नववी-दहावीच्या वयात झाली .पण वडील मात्र अत्यंत प्रागतिक विचारसरणीचे आई शिक्षिका त्यामुळे शिक्षणाला प्राधान्यक्रम असणे अपरिहार्यच होते. तेजस्वी मॅडमच्या जन्मानंतर आईने डी .एड , बी .ए , एम. ए , एम .एड इथपर्यंत भरारी घेतली. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या लेकीला ही शिक्षण प्रेमी बनवण्याचा अट्टाहास केला .त्या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले .आज त्यांची लेक डीएसपी आहे ही त्यांच्या कष्टप्रद जीवनाची साफल्यपूर्ती आहे. तेजस्वी मॅडमची शैक्षणिक वाटचाल मात्र कहाॅ से कहाॅ तक अशीच आहे. स्वप्नाळू वयात भारतीय सैन्य दलातील शहीद पायलट निर्मलजीत हे त्यांचे आकर्षण होते . मॅडमनाही पायलट व्हायचे होते. मात्र त्यांना चष्मा लागला आणि त्यांचा स्वप्न भंग झाला . त्यांनी बारामती विद्या प्रतिष्ठान मधून बीएससी बायोटेक्नॉलॉजी ची पदवी प्राप्त केली .तद्नंतर त्यांना आय एन एस सी आर बेंगलोर येथील सी .एन . राव यांच्या समवेत शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी संपूर्ण भारतातून दहा जणांची निवड झाली होती .महाराष्ट्रातून फक्त एकट्या मॅडम ची निवड झाली होती. संशोधन कार्यातून त्यांच्या जीवनाला एक वेगळा आयाम मिळाला असता खरा पण तेजस्वी मॅडमनी ती संधी नाकारली. कदाचित नियतीच्याच मनात वेगळेच काहीतरी असावे. त्यांनी पुणे येथील आय.सी.एस लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला मात्र त्यातील दुसऱ्या वर्षानंतर त्यानंतर त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला वाईटातून काहीतरी चांगले घडते या व्यक्तीचा अनुभव त्यांना त्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र त्यातील दुसऱ्या वर्षानंतर च्या अपयशानंतर त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला . वाईटातून काहीतरी चांगले घडते या उक्तीचा अनुभव त्यांना त्या लॉ कॉलेजमध्येच आला. त्या अध्ययनाच्या कालावधीमध्ये त्यांचे सहाध्यायी मित्र द हिंदू ,इंडियन एक्स्प्रेस व इतर वृत्तपत्रांचे वाचन अगदी क्लास सुरू असतानाही करत असत .प्राध्यापक त्यांच्यावर चिढायचे. मात्र त्यांची वाचनवेडाची सवय जात नव्हती. नेमके याच वाचनवेडाच औत्सुक्य तेजस्वी मॅडमना वाटायचे .त्यांनी त्या सहाध्यायींना विचारले की ‘ तुम्ही वृत्तपत्राचे वाचन का करतात ‘ ? त्यांनी उत्तर दिले आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहोत आणि त्या क्षणीच मॅडमना स्पर्धा परीक्षेचा मंत्र सापडला. मग सुरू झाला स्पर्धापरीक्षेचा सिलसिला! तेजस्वी मॅडमनी त्यातील सखोल ज्ञान प्राप्त केले .त्या स्वतःच यू.पी.एस.सी परीक्षेसाठी सज्ज झाल्या. प्रबळ इच्छाशक्ती.. सातत्य.. अथक परिश्रम घेण्याची तयारी या त्रिसूत्रीच्या आधाराने त्यांनी स्वप्न पाहिले .ते खाकी वर्दीचे! अखेर 2012 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 198 वा रॅंक मिळवून तेजस्वी मॅडमनी आपल्या सोनेरी यशाचा झेंडा फडकविला. हा केवळ त्यांच्या कुटुंबीयांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रासाठी भारावलेला क्षण होता . २०१२ ते १४ या कालावधीमधील खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची परतूर येथे परीक्षाविधीन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सी.आय.डी , एडिशनल एस.पी .पुणे (ग्रामीण डी.सी.पी पुणे शहर (ट्रॅफिक) डी.एस.पी सातारा यासह विविध पदावर त्यांनी जबाबदारी पार पडली .विशेषता सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यकाल अतिशय झगमगता राहिला . कोरोना महामारी च्या भयानक आपत्तींनंतर त्यांचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण पोलिस दलाचे मनोबल वाढवून जनतेला धीर देऊन कोरोना विरुद्ध अभियानामध्ये तेजस्वी मॅडमनी समर्पितपणे काम केले .सहकारी पोलीस कर्मचाऱ्या विषयी अनाम जिव्हाळा व त्यांच्या कुटुंबा विषयी चे प्रेम या प्रेरणेतून त्यांनी पोलिसांसाठी covid-सेंटरची उभारणी केली .विशेषता आशा वर्कर विषयी त्यांच्या मनामध्ये अव्यक्त कृतज्ञता आहे. आणि म्हणूनच तेजस्वी मॅडमना कोरोना योद्धा म्हणून गौरवले गेले .ही त्यांच्या मर्मबंधातली ठेव म्हणावी लागेल. सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अवैध धंदेवाले ,समाजकंटक, गुंड क्रूर काळजाचे गुन्हेगार ,माफिया ,हिंसक कारवायांना रसद पुरविणारे व राजकीय दबाव आणू पाहणारे राजकारणी यांना हिसका दाखवून दिवसा तारे दाखवले. झिरो क्राईम ही त्यांची संकल्पना आहे. प्रत्यक्ष जनसंवादातून समस्याचे निराकरण होऊ शकते यावर त्यांचा विश्वास आहे. वाचनातून चर्चेतून बरेच काही शिकता येते जाणीवजागृती होते हा त्यांचा आवडता सिद्धांत आहे. आपल्या जबाबदारी प्रति श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे .असे त्या आग्रहपूर्वक प्रतिपादन करतात. आधुनिक संगणकीय ज्ञानाइतकीच वाचन संस्कृतीची जोपासना ही गरजेचे आहे हे स्वजीवनाभुवातून निर्देशित करतात. कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होणे, कायद्याविषयी आदर असणे या बाबी अत्यंत महत्त्वाचे आहे. अशी त्यांची मनोधारणा आहे .’ सद् रक्षणाय.. खलनिग्रहाणाय हे ब्रीदवाक्य जपण्याचा त्यांचा असोशीने प्रयत्न आहे. तेजस्वी मॅडमच्या कुटुंबातील शैक्षणिक धोरणामध्ये आता अमुलाग्र बदल झाला आहे. आज त्यांच्या घरामध्ये उच्चशिक्षितांची मांदियाळी आहे. ही बाब निश्चितच सुखावह आहे. मॅडम जरी कर्तव्यकठोर असल्या तरीही त्या नक्कीच संवेदनशील आहेत. त्यांचा आवडता कवी ग्रेस यांची ‘शिल्पात गंध स्मरणाचा’ ही रचना त्यांना भावते .स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या नवयुवक-युवतींना संदेश देताना त्या म्हणतात बालवयापासून ध्येयनिश्चिती हवी. आपल्या क्षमतेची जाणीव असणे आवश्यक.. निर्णयक्षमता सजग असणे गरजेचे समाजातील योग्य परिवर्तनीय बदलाचा स्वीकार आवश्यक.. मनबुद्धीचे निर्णय शाश्वत.. संकल्प आणि सिद्धी यामध्ये नियती उभी असते .असे जरी मानले तरी प्रयत्नांची शिकस्त महत्त्वाचे आहे .तेजस्विनी मॅडम पोलीस प्रशासन जनता भिमुख असण्यासाठी व्यग्र आणि व्यस्त असतात. पोलीस दलातील कॉन्स्टेबल पासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी अतिशय सौदार्हाचे संबंध जपणाऱ्या तेजस्वी सातपुते मॅडमना आम्हा सोलापूर जिल्हा वासियांचा मनःपूर्वक सलाम!
” जिद्द हवी ,जोश हवा कर्तुत्वाचा जयघोष हवा … नव्या आशांना, नव्या दिशांना तेजस्वी सातपुते मॅडम तुमचा स्पर्श हवा !…
-रशीद शेख
मु.पो चांदापुरी
तालुका -माळशिरस जिल्हा -सोलापूर
संपादक जनविद्रोही
डॉ.कुमार लोंढे मो.9881643650