गडचिरोली ( ११ जुलै ) : करोनाने संपूर्ण देश त्रस्त असून सुद्धा सत्ताधारी आणि सत्ता विरोधी पक्ष हे कोणीही गोरगरीब आणि कष्टकऱ्यांकडे लक्ष देत नाही, खोटे दावे करत खुर्चीच्या माध्यमातून एक किळसवाणा प्रकार आज देशात सुरु आहे. अशी टिका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.
गेले दोन महिने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस अॅड. राजेंद्र कोरडे, महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील, विद्यार्थी नेत्या साम्या कोरडे, पक्ष प्रशिक्षण, प्रचार व प्रसार समिती सदस्य भाई चंद्रशेखर नलावडे पाटील व पक्षाचे खजिनदार भाई राहुल पोकळे या काही नेत्यांनी ऑनलाईन पद्धतीने पक्ष अभ्यास शिबीरे आयोजित केली. या शिबीरांमध्ये पक्षाचे जवळपास पंधरा हजार कार्यकर्ते सहभागी झाले. तसेच भाई चंद्रशेखर नलावडे – पाटील यांच्या प्रयत्नांनी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी सहभागी कार्यकर्ते व विजेत्यांचे कौतुक करतांना भाई जयंत पाटील बोलत होते.
भाई जयंत पाटील म्हणाले,अशा परिस्थितीत सक्षम, जबाबदार आणि बदल घडवू शकण्याची क्षमता ठेवणारे कार्यकर्ते व नेतृत्व घडवणे अत्यंत आवश्यक असून ती जबाबदारी ही शेतकरी कामगार पक्षासारख्या पक्षांची आहे. कार्ल मार्क्सच्या ‘टीका आणि आत्मटीका’ या संकल्पनेवर आपल्याला वाटचाल करायची आहे.
सुरुवातीच्या काळात शेतकरी कामगार पक्षाचे जे अभ्यास वर्ग व्हायचे त्यात अनेक नेते तयार झाले व ते आजही पक्षाबरोबर ठामपणे राहून लाल बावटा घेऊन समाजात कार्यरत आहेत. परंतु आजच्या या सोशल मीडियाच्या आधुनिक युगात सर्व काही बदलून गेल्याचे आणि सर्व काही झटपट प्राप्त करण्यासाठी आजची तरुण पिढी आग्रही असल्याचे आपल्या ध्यानात येते, असे मत भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
एक नवीन पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातून एकच योग्य मार्ग आहे आणि तो म्हणजे अभ्यास शिबीर व स्पर्धा, असे म्हणत सहभाग घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
आज गडचिरोलीसारख्या अतिटोकाच्या जिल्ह्यातही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते काम करत आहेत. शेतकरी,कष्टकरी,कामगार आणि आदिवासी, बहुजन समाजासाठी आपले अवघे आयुष्य झोकून देणारे कार्यकर्ते व गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे ध्येय ठेऊनच यापुढे शेतकरी कामगार पक्ष समाजामध्ये कार्यरत राहील,अशी आशाही सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
निबंध स्पर्धा विजेते
१) डॉ. दिपक सर्जेराव शेटके-पाटील वडकशिवाले, ता.- करवीर, कोल्हापूर
२) प्रा. डॉ. सुनिल पवार
पेण, जि.- राजगड
३) वैभव उत्तम जाधव, हिंगोली
४) शांताराम वाघ, पुणे
५) अविनाश निकुंभ, जळगाव
६) बापूराव भास्कर वराडे
७) आर्किटेक्ट सिद्धार्थ दिक्षीत
राजारामपुरी, कोल्हापुर
८) अर्चना मोहन वाघमारे,
घोडेगाव, आंबेगाव, पुणे
९) अंकुश मुढे
आटपाडी, सांगली
१०अ) अनिकेत कोळी, मोरा, कोलीवाडा, ता. उरण, रायगड
१०ब) डॉ. हर्षवर्धन भोसले रूकडी, ता.- हातकणंगले, कोल्हापूर