पुणे ,विभागीय प्रतिनिधी.चक्रधर मेश्राम.दि 9 जुलै 2021:-
पुणे येथील एका हॉस्पिटलच्या कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये निवासी असणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरूम मध्ये व बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायंकाळी आपल्या कामावरून निवासस्थानी परत आल्यानंतर बल्ब लावण्याचा प्रयत्न केला असता, बल्ब लागले नाहीत. त्यानंतर बल्बमध्ये लावलेल्या छुप्या कॅमेऱ्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात सदर महिला डॉक्टरांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
सदरची घटना सहा जुलै रोजी सकाळी पावणे नऊ ते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. महिला डॉक्टर सकाळी ड्युटीला गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने बनावट चावीच्या मदतीने घराचा दरवाजा उघडून घरातील बेडरूम व बाथरूममध्ये छुपे कॅमेरे असलेले बल्ब बसवले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदरच्या महिला डॉक्टर या भारती विद्यापीठ हॉस्पिटल मध्ये नोकरी करत असून, विद्यापीठाच्या आवारातील स्टाफ कॉर्टरमध्ये राहत आहेत. दिवसभराचे काम संपवून घरी आल्यानंतर, त्यानी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये प्रवेश करून व बल्ब लावण्याचा प्रयत्न केला असता, बल्ब लागला नाही सदर बल्बची पाहणी केल्यानंतर, बल्ब वेगळा वाटल्यामुळे इलेक्ट्रिशियन यांना बोलावून घेऊन, त्यांना बल्ब दाखवला.
तेव्हा सदर इलेक्ट्रीशियन ने या बल्बमध्ये छुपा कॅमेरा असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर महिला डॉक्टरांनी घरातील इतर बल्बची पाहणी केली, तेव्हा त्यांच्या बेडरूममध्ये ही असाच दुसरा छुपा कॅमेरा असलेला बल्ब बसवल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला व घटनेची माहिती दिली. सदर घटनेची माहिती समजताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, जगन्नाथ कळस्कर हे महिला पोलिस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी आले होते. त्यानंतर त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून महिला पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर गुन्ह्याचा तपास वर्ग केला आहे.