कोंढवा पुणे – रुग्ण हक्क परिषदेचा महत्वकांक्षी प्रकल्प, रुग्णांच्या हक्काचे, अधिकाराचे, शासनाच्या मार्गदर्शक तत्वावर बिलाची आकारणी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे राज्यातील मॉडेल म्हणून पाहिले जाणारे “आरएचपी हॉस्पिटल” येत्या १५ जुलै रोजी सुरू होणार असल्याची माहिती रुग्ण हक्क परिषदेचे सर्वेसर्वा आरएचपी हॉस्पिटलचे प्रमुख उमेश चव्हाण यांनी सांगितले.
उमेश चव्हाण म्हणाले की, गेल्या तीन वर्षात आपले हॉस्पिटल असावे हा मनोदय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यातून शिरूर येथे तात्पुरता प्रयोग केला. कोविडच्या दुसऱ्या लाटेत छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटल सुरू केले मात्र तेही भाडे तत्वावर होते. कोंढवा येथील आरएचपी हॉस्पिटल रुग्ण हक्क परिषदेच्या स्वतःच्या मालकीचे आहे. याची विलक्षण सुंदर आणि देखणी संरचना असलेले हे कोंढवा भागातील मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे.
नगरसेवक साईनाथ बाबर म्हणाले की, हॉस्पिटल उभारणीचे कार्य अत्यंत जीव ओतून केले आहे. आम्ही स्थानिक नगरसेवक म्हणून नाही तर या हॉस्पिटलचा भाग म्हणून लागेल ती मदत करू. १५ जुलै पासून नागरिकांच्या सेवेत “आरएचपी हॉस्पिटल” रुजू होत असल्याचा आनंद आहे.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख डॉ. सलीम आळतेकर, पुणे जिल्हाअध्यक्ष अल्ताफ तारकश, सामाजिक कार्यकर्ते सलीम कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश भोईटे, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अपर्णा साठे, कार्यालयीन उपसचिव गिरीश घाग, रुग्ण हक्क परिषदेचे कार्यालयीन व्यवस्थापकीय संचालक संजय जोशी उपस्थित होते.