मुंबई – विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 26 जून 2021:-
देशातील सर्व बहुजनांचे आरक्षण भाजपला संपवायचं आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणजे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याची घटना होय, असा आरोप माजी मुख्यमंत्री, अशोक चव्हाण यांनी भाजपवर केला आहे. तसेच त्यानी अनिल देशमुख यांच्यावरील केंद्र सरकारच्या वतीने सीबीआय व ईडीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्यवाहीवर सुद्धा टीका केली आहे. भाजपचे नेतेमंडळी केंद्रीय संस्थांना हाताशी धरून राजकीय सूडबुद्धीने कार्यवाही करत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. ते आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
संपूर्ण देशात कोरोना सारख्या भीषण महामारीने जनतेला हैराण केले आहे, तर दुसरीकडे मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षण न्यायालयामध्ये भाजपने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे टिकले नाही. तसेच ओबीसीचे राजकीय आरक्षण हे न्यायालयाने भाजपच्या केंद्रातील हलगर्जीपणामुळे स्थगित केले आहे. असा आरोप त्यांनी केला आहे. देशातील बहुजनांची आरक्षण पद्धत भाजपला संपवून, त्यांना पुन्हा गुलाम बनवण्याचे धोरण भाजप करत आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवण्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज सगळीकडे निदर्शने केली आहेत. यावेळी माध्यमांशी बोलत असताना चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याप्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत, मोदी सरकार हाय.. हाय.. च्या घोषणा दिल्या आहेत.