मुंबई |विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 26 जून 2021:-
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये इतर मागास वर्गीय अर्थात ओबीसी संवर्गासाठी आरक्षण पूर्वीप्रमाणे ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या वतीने शनिवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले आहे. पक्षाने यापूर्वी राज्यभरात दहा हजार ठिकाणी निषेध आंदोलनं केली आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते, देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ निदर्शने करत असताना, नागपूरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे निदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, प्रवीण दरेकर यांनी ठाण्यात झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. प्रवीण दरेकर यांनी आयोजित केलेल्या चक्काजाम आंदोलनात ठाणे-मुंबई जोड रस्ता काही काळ बंद करण्यात आला होता. पुणे येथे ओबीसी समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या, पंकजा मुंडे यांनी सांगितले की, भाजपची मागणी मान्य न केल्यास पक्ष भविष्यात मोठे आंदोलन करेल.
ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम राखण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असलेले ओबीसी आरक्षण मिळवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. ओबीसी आरक्षणाची बाब न्यायालयात प्रलंबित असताना, राज्य सरकारने सहकारी क्षेत्रातील निवडणुकासह इतर विविध क्षेत्रातीलनिवडणुका तहकूब केल्या आणि कोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिल्यावरच निवडणुका जाहीर केल्या असल्याचा, आरोप पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे. तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी त्यांनी सरकारला केली आहे.