भंडारा:-विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 26 जून 2021:-
जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी मानवविकास मिशन मधून ‘मोहफूल- आदिवासी उपजिविकेचे एक साधन’ हा प्रकल्प राबविण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. व हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
मोहफूलांचे झाड आदिवासी व शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष आहे. मोहफूलांच्या माध्यमातून शेतकरी व आदिवासी कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण होऊ शकते. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोहफूल प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास शेतकरी व आदिवासी कुटुंबांना रोजगार उपलब्ध होईल, व त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास भाजप नेते श्री रेखलाल टेंभरे यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पासाठी सरकारने ९०% हिस्सा दिला आहे. ३ कोटी ३६ लाख ३६ हजार रुपये इतक्या निधीस प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित १०% लाभार्थी किंवा आदिवासी समाज किंवा संस्था यांचा राहणार आहे. हा प्रकल्प राबविण्यापूर्वी त्याचे आधारभूत सर्वेक्षण करण्यात येईल. प्रकल्प संपल्यावर त्याच्या फलनिष्पत्ती चे मुल्यमापन करण्यात येणार आहे. या योजनेत जिल्ह्यातील १५ वनधन केंद्र, ग्रामसंघाना मोहफूल खरेदी करुन सामुहिक विक्री करण्यासाठी प्रति केंद्र १० लाख रुपयांचे खेळते भांडवल देण्यात येणार आहे. वनधन केंद्रातील आदिवासी कुटुंबांना लागणारी जाळी, ताडपत्री, प्लास्टिक, कॅरेट, साहित्य खरेदीसाठी प्रति कुटूंब २ हजार रुपये देण्यात येतील. तसेच ग्रामीण भागातून मोहफूल खरेदी करून त्यांची वाहतूक करणे व शीतगृहात साठवणूक करण्यासाठी वनधन केंद्र, ग्राम संघातील सदस्यांना डीबीटीद्वारे अर्थसाह्य करण्यात येणार आहे. या बरोबरच मोहफुल आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री खरेदी करता यावी याकरिता प्रत्येक वनधन केंद्रांना ५ लाख रुपये इतका निधी मिळणार आहे. करिता शेतकरी व आदिवास्यांनी या प्रकल्पाचा लाभ घ्यावा असे आवाहन रेखलाल टेंभरे (भाजप नेते व जीडीसीसी बॅंक डायरेक्टर ) यांनी केले.