मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 26 जून 2021:-
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह जगभरात साजरा केला जात आहे. पण या योग दिनावर सुप्रीम कोर्टाचे माजी न्या. मार्कंडेय काटजू यांनी कडाडून टीका केली आहे. भारतात अनेकांना खायला अन्न मिळत नाही आणि बेरोजगारीची समस्या तीव्र बनली असताना त्यांना योगाचे धडे दिले जात आहेत, असं न्या. काटजू यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन एकामागून एक अनेक ट्विट करत त्यांनी सरकारच्या विविध योजना आणि योग दिनावर कडाडून टीका केली. (SC former Justice Markandey Katju critisized Internation Yoga Day)
काटजू म्हणतात, “मी याला नाटक मानतो. ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारतात ५० टक्के लहान मुलं कुपोषित आहेत. देशात ५० टक्के महिला अॅनिमियाग्रस्त आहेत. तसेच बेरोजगारीनं उच्चांक गाठला आहे. खाद्य पदार्थ, इंधन, गॅस सिलेंडर इत्यादींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. शेतकऱ्यांवरील संकटं तसेच जनतेसाठी योग्य आरोग्य सुविधांची वानवा आहे. अशा परिस्थितीत लोकांना योग करण्यास सांगणं म्हणजे हास्यास्पद आणि थट्टा आहे.”
योगासनं लोकांच्या ‘या’ समस्या सोडवेल का? भारतातील लोकांना योगासनांची नव्हे अन्न, नोकरी, निवारा, योग्य आरोग्य सुविधा, चांगलं शिक्षण आणि इतर सुविधांची गरज आहे. कोणत्याही भुकेल्या, बेरोजगार पुरुष किंवा महिलेला योगासनं करायला लावणं एक क्रूर प्रकार आणि भरकटवण्याचा प्रकार आहे. असं म्हटलं जात की योग चांगलं आरोग्य आणि शांत मन तयार करतं. पण ही योगासन एखाद्या गरीब, भुकेल्या आणि बेरोजगार पुरुष किंवा महिलेला हे सगळं देऊ शकतं का? योग आमच्या कुपोषित मुलांना आणि अॅनिमिया झालेल्या महिलांना बरं करु शकेल का? असे सवालही न्या. काटजू यांनी उपस्थित केले आहेत.
‘योग दिन’ हा राजकीय अजेंड्याचा भाग?? काटजू म्हणाले, “अनेक लोक मला विचारतात की, माझा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी, होळी, फादर्स डे, मदर्स डे, बाल दिन यांच्या विरोधात आहे का? की केवळ योग दिनालाच विरोध आहे? यावर मी म्हणेन योगासनांच्या नावाखाली सुरु असलेल्या इतर गोष्टींच्या मी विरोधात आहे. राजकीय अजेंड्यासाठी योग दिवससारखे दिवस साजरे केले जातात याच्या मी विरोधात आहे. रोमन सम्राट म्हणायचे की, जर तुम्ही लोकांना भाकरी देऊ शकत नसाल तर त्यांना सर्कस द्या, असा हा प्रकार आहे.”लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी स्टंट सुरु?? आजचे भारतीय सम्राट म्हणतात, “जर तुम्ही गरीबी, बेरोजगारी, भूक, महागाई, आरोग्य सुविधा, शेतकरील संकटं या समस्यांवर मात करु शकत नसाल तर भारतीय लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी स्टंट आणि नाटकं करु शकता. यामध्ये विकास, योग दिवस, राम मंदिर, स्वच्छता अभियान, सीएए, कलम ३७० यांचा समावेश होतो, असंही न्या. काटजू यांनी सरकारवर टीका करताना म्हटलं आहे ..