मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 26 जून 2021:-
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे हे इतरांच्यासाठी देशभक्त असतील पण, आपण त्यांना देशभक्त मानत नाही, असे वादग्रस्त विधान पुन्हा भाजपच्या वादग्रस्त खासदार, प्रज्ञासिंह ठाकुर यांनी केले आहे. माझ्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी हेमंत करकरे यांनी अनेक आचार्य व शिक्षकांची बोटे आणि बरगड्या मोडल्या आहेत आणि मला खोट्या प्रकरणात ओवले आहे.
त्यामुळे हेमंत करकरे हे इतरांच्यासाठी देशभक्त असतील, पण मी त्यांना देशभक्त मानत नाही, असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वक्तव्य केलेलं आहे. या पूर्वी ही प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्या शापामुळेच महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी, हेमंत करकरे ठार झाले आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य केलेले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण देशात खळबळ माजली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपवर संपूर्ण देशातून टीका झाली होती.
प्रज्ञासिंह ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. हा बॉम्ब स्फोट सन २००८ मध्ये मालेगाव येथे घडवून आणला होता. त्यावेळी या बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या बॉम्बस्फोटांमध्ये १० व्यक्तींचा मृत्यू झालेला होता, तर साधारणपणे ८० व्यक्ती जखमी झाल्या होत्या. त्यानंतर सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सिंग ठाकूर या भाजपकडून खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत.
प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणून घोषित केले होते. त्यावेळी ही त्यांच्यावर देशातून टीका झालेली होती. यावेळी पंतप्रधान, नरेंद्र मोदींनी ही त्यांच्यावर टीका करत, आपण प्रज्ञासिंहला मनापासून कधीच माफ करू शकणार नाही, असे वक्तव्य केले होते. अशा प्रकारचे सतत वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याची आवड असणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यामध्ये खासदार झाल्यानंतर बदल होणे अपेक्षित होते, मात्र ते त्यांना शक्य होताना दिसत नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे ही आता भाजपवर टीका होत आहे.