मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम, दि. 26जून 2021:-
सीबीआय आणि ईडी या संस्था भाजपचे सदस्य आहेत काय? नसतील तर, त्यांनी तातडीने अगोदर आयोध्या येथील राम मंदिर बांधकाम जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते, संजय राऊत यांनी केली आहे. शंभर कोटी रुपयांची वसुली प्रत्येक महिन्यात करण्याच्या आरोपामुळे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानावर आज ईडीने छापेमारी केली आहे.
त्याच बरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अजित पवार व परिवहन मंत्री, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याचा भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत झालेला ठराव, या विषयावर बोलताना संजय राऊत यांनी ही मागणी केली आहे. ईडी व सीबीआय या स्वायत्त संस्था असलतील तर, त्यांनी अगोदर आयोध्या येथील राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहारची अगोदर सखोल चौकशी करावी, आणि नंतर मग इतर प्रकरणाचा तपास करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सीबीआय किंवा ईडी यांच्याशी आमचे कोणत्याही प्रकारचे वैर नाही. त्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्वायत्त संस्था आहे. जर देशाचे नुकसान होणारी एखादी आर्थिक गैरव्यवहाराची घटना घडलेली असेल, तर त्याचा सखोल तपास झाला पाहिजे, असे आमचे ठाम मत आहे. पण आज सीबीआय व ईडी या संस्था केंद्रसरकारच्या आदेशानुसार कार्यवाही करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही संस्था भाजपच्या सदस्य तर नाहीत ना ? त्या आपल्या पक्षाच्या हितासाठी विरोधी पक्षावर सूडबुद्धीने काम करत आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.असा आरोप शिवसेनेचे नेते व खासदार, संजय राऊत यांनी केला आहे.