मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि.25 जुन 2021:-
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आज सकाळी नागपूर येथे ईडीने छापे टाकले आहेत. याच वेळी ईडीने त्यांच्या इतर नातेवाईकांच्या घरावर ही छापे टाकून कार्यवाही केली आहे. आज सकाळी सक्तवसुली संचालनालय याने केलेल्या या कार्यवाहीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री मुंबईवरून ईडीचे पथक नागपूरला रवाना झाले होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी नागपुर मधील स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नागपुर मधील जीपीओ चौकात असणाऱ्या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर व त्यांच्या इतर नातेवाईकांच्या घरावर एकाच वेळी छापे टाकले आहेत.
यावेळी पथकासोबत पोलिसांचा भला मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. १६ जूनला एका कोळसा व्यापार्याच्या घरावर, तसेच दोन सीएच्या घरावर ईडीच्या पथकाने छापे टाकले होते. त्यावेळीच येडी आता अनिल देशमुख यांच्या घराची झाडा- झडती घेणार, अशी शक्यता बळावली होती. मुंबई पोलिसांच्याकडे महिना शंभर कोटी वसुलीचे टारगेट प्रकरण उघडकीस आल्यानंतर, अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्री पदाचा त्याग करावा लागला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून, तपासाला सुरुवात केली आहे. त्यांच्याशी संबंधित असलेल्या कोलकत्ता येथील दोन बनावट कंपन्या सीबीआयच्या हाती लागल्या आहेत. या दोन बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे गैरव्यवहार झाले असल्याचे सीबीआयच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर आता या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालय सक्रिय झाले आहे. त्यानी आज सकाळी नागपूर येथील अनिल देशमुख व त्यांच्या घनिष्ठ नातेवाईकांच्या घरावर छापे टाकून, कार्यवाही केली आहे.