औरंगाबाद दि. 25 जून – समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर भाष्य करणारे लेख, कविता, कथा साहित्यिकांकडून लिहिल्या जातात. सादर केल्या जातात. समाज माध्यमात त्या प्रकाशित होत आहेत, मात्र गेल्या दोन वर्षात थिएटर नाट्यगृह – सभागृह बंद अवस्थेत आहेत. कोरोनाचे पार्श्वभूमीवर आरोग्य विषयातील निर्माण झालेल्या अडचणीमुळे सर्व क्षेत्र कमी अधिक प्रमाणात खुली झाली आहेत. तरीही शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्र अद्यापही बंद अवस्थेत आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना वैद्यकीय क्षेत्राचे आलेले बरे-वाईट अनुभव लक्षात घेता, मोठ्या प्रमाणावर आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील विपुल साहित्याची निर्मिती झाली आहे. या लेखन साहित्याला दर्जेदार व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने भारतातील पहिले दोन दिवसीय अ.भा. मराठी आरोग्य साहित्य संमेलनाचे आयोजन औरंगाबाद शहरात होणार असल्याची माहिती रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष तथा पहिल्या अ. भा. मराठी आरोग्य साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक उमेश चव्हाण यांनी औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी मंचावर रुग्ण हक्क परिषदेचे मराठवाडा विभाग अध्यक्ष राजनभाई हाऊजवाला, आरएचपी हॉस्पिटल औरंगाबादचे संचालक अमित हौजवाला, रुग्ण हक्क परिषदेचे केंद्रीय सचिव संजय जोशी, रुग्ण हक्क परिषदेचे सल्लागार प्रा. डॉ. गनी पटेल मंचावर उपस्थित होते.
उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, औरंगाबाद नगरी ही बुद्धिवंतांची, लेखकांची, साहित्यिकांची म्हणून देशात प्रसिद्ध आहे. आरोग्य – वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नामांकित डॉक्टर आणि लेखक यांच्यासाठी औरंगाबाद येथे होणाऱ्या आरोग्य साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर विचार मनोगत व्यक्त करता येणार आहे. आरोग्य क्षेत्रातील अन्याय अत्याचाराच्या घटना, लुटीच्या घटना, वैद्यकीय क्षेत्राची प्रकर्षाने दिसून येत असणारी काळी बाजू तर दुसरीकडे लोकांना जीवदान देऊन बरे करणारे उपचार देणारे आरोग्य क्षेत्रातील समाजसेवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, आरोग्य विषयात झडणाऱ्या चर्चांना सांस्कृतिक साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देता येणे शक्य होईल.
रुग्ण हक्क परिषदेने आज पर्यंत लाखो नागरिकांना माफक किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपचार मिळवून दिले आहेत. दरवेळी वैद्यकीय क्षेत्रात लाखो रुपयांची लूट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी अत्यंत माफक दरामध्ये सुद्धा दर्जेदार उपचार करता येतात, यासंबंधीचे यशस्वी ठरलेले पुण्यातील आरएचपी क्लिनिकचे मॉडेल औरंगाबाद शहरामध्ये सुरू करण्यात येणार आहे. आर एचपी क्लिनिकमध्ये माफक किमतीमध्ये शस्त्रक्रिया सोबतच विविध रोग आणि आजारांवर माफक दरात उपचार करण्यासाठी पुढील महिन्यात २५ जुलै रोजी आर एच पी हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे.