मुंबई: विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम .दि 24 जून 2021 :-
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. 23 जून रोजी आत्मसमर्पितांसाठी असलेल्या नवजीवन वसाहत येथील कार्यक्रमाप्रसंगी एका महिला नक्षलवाद्याने गडचिरोली जिल्ह्य पोलीस प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले आहे. शशीकला उर्फ गुनी उर्फ झुरी उर्फ अंजु आसाराम आचला ( 30 ) असे या तरुण महिला नक्षलवाद्याचे नाव असून तिच्यावर 6 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
शशीकला उर्फ गुनी उर्फ झुरी उर्फ अंजु आसाराम आचला (30) रा. मोठा झलीया पोमके गॅरापत्ती ता. धानोरा येथे राहत होती. डिसेेंबर 2006 रोजी टिपागड दलम मध्ये भरती झालेली शशीकला उर्फ गुनी हि सध्या टिपागड एलओएस मध्ये ए.सी.एम पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे 15, जाळपोळ 1 व इतर 4 असे एकुण 20 गुन्हे दाखल असून शासनाने 6 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन 2019 ते 2021 सालामध्ये 4 डिव्हीसी, 2 दलम कमांडर, 3 उपकमांडर, 29 सदस्य व 1 जनमिलीशिया असे एकुण 39 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
तसेच 23 जून रोजी आत्मसमर्पीतांसाठी असलेल्या नवजीवन वसाहत येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे हस्ते नवजीवन वसाहत बोर्डचे अनावरण, वृक्षारोपण व आत्मसमर्पण कल्याण कार्डचे अनावरण करण्यात आले व नक्षलवादाचा खडतर मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेली शशीकला उर्फ गुनी उर्फ झुरी उर्फ अंजु आसाराम आचला हीचा पोलीस अधीक्षक यांनी सत्कार केला.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आत्मसमर्पितांसाठी नवजीवन वसाहत येथे विद्युतीकरण, पाण्याची सुविधा तसेच त्यांना नोकरी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार तसेच शिवणकाम, मोटार ड्रायव्हिंग, गवंडी, काम याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणार असल्याचे सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पालीस अक्षीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी सोमय मुंडे हे उपस्थित होते.