@ शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार व जयंत पाटील यांची उपस्थिती
@ शिवाजी बनकर, मधुकर बनसोडे व विजय राऊत यांच्यासह नेतेमंडळींचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 20 जून 2021:-
सांगोला नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या बनकरवाडी, राऊतमळा, माळवाडी, फुलेनगर व पुजारवाडी परिसरात शेतकरी कामगार पक्षाला जबरदस्त धक्का देत माजी नगरसेवक शिवाजी बनकर, विजय राऊत, माळी महासंघाचे राज्याचे कार्याध्यक्ष सोमनाथ राऊत, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा सांगोला तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक मधुकर बनसोडे, विद्यमान नगरसेविका रंजना बनसोडे, मेडशिंगी ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन वसेकर, फुलाबाई बाबुराव वसेकर, ॲड. विक्रांत बनकर, ॲड. सोमनाथ नवले, इंजि. किशोर गोडसे, संजय गार्डे आदींनी शेतकरी कामगार पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, मा. आमदार दिपकआबा साळुंखे, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, आमदार बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, यशवंत माने, ज्येष्ठ नेते राजन पाटील, उत्तमराव जानकर, भगीरथ भालके, सुरेश पालवे, लतीफ तांबोळी, सांगोला नगरपालिकेचे नगरसेवक नाथा जाधव, सांगोला नगरपालिकेचे गटनेते सोमनाथ लोखंडे, शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील आदींसह प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत पुणे येथे हा प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.
संपूर्ण सांगोला शहर व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेली सांगोला नगरपालिकेचे निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचा पारंपारिक बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बनकरवाडी, राऊतमळा, माळवाडी, फुलेनगर व पुजारवाडी या परिसरातून या दिग्गज नेते मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या आगामी नगरपालिकेची निवडणूक जिंकण्याच्या मणसुब्यांवर पाणी फिरले आहे.
नगरपालिका असो किंवा विधानसभा निवडणूक हा परिसर शेतकरी कामगार पक्षासाठी नेहमीच अभेद्य असा बालेकिल्ला ठरला आहे, या परिसरातून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना नेहमीच विक्रमी मताधिक्य मिळत होते. याच बळावर शेतकरी कामगार पक्षाने आजवर सांगोला शहराच्या राजकारणात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. अखेर शेतकरी कामगार पक्षाचा हा अभेद्य किल्ला असणाऱ्या परिसराला सुरुंग लागल्याने आगामी नगरपालिका निवडणुकीत याचा प्रस्थापित शेतकरी कामगार पक्षाला प्रचंड मोठा फटका बसणार आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाइतकीच शहर व तालुक्यात ताकद असणार्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र याचा चांगलाच फायदा होणार आहे. केवळ सांगोला नगरपालिकाच नव्हे तर येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीतदेखील या प्रवेशाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल शेतकरी कामगार पक्षातून ज्या नेतेमंडळींनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासास कधीही तडा जाणार नाही शहरासह संपूर्ण तालुक्याच्या सर्वांगीण विकासास आपण सदैव कटिबद्ध राहू, आलेल्या प्रत्येक नेतेमंडळी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यथोचित सन्मान राखला जाईल व त्यांना न्याय दिला जाईल. नगरपालिका निवडणुकीत ताकद दाखवून देऊ गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला शहर व तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची प्रामाणिकपणे सेवा केली. पक्षनेतृत्वाने कधीही आपल्या प्रयत्नांची कदर केली नाही. म्हणून सांगोला शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत आपण आपल्या सहकाऱ्यांसह आमची ताकद शहर व तालुक्याला दाखवून देऊ. अशी प्रतिक्रिया शिवाजी बनकर बांधकाम सभापती सांगोला नगरपालिका यांनी व्यक्त केली आहे.