🔹 प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पप्पू देशमुखकडून महापौरांची बदनामी?
🔹लेखा परीक्षण अहवाल प्रकरणी न्यायालयीन चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करा : महापौर
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 10 जून 2021:-
उपसंचालक महानगरपालिका लेखा परीक्षण विभाग यांचा लेखा परीक्षण अहवाल आज सभागृहामध्ये ठेवण्यात आला होता. विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकुलकर यांनी निवेदन दिल्यानंतर न्यायालयीन चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले. मात्र, असे असतानाही केवळ प्रसिद्धीसाठी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्याकडून कोणतेही पुरावे आणि तथ्य नसतानाही महापौर राखी कंचर्लावार यांच्यावर भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत.
2015-2016 या वित्तीय वर्षामध्ये झालेल्या कामाच्या लेखापरीक्षकांत 71 त्रुटी निघाल्या. 2015-2016 या वित्तीय वर्षामध्ये स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचेच नगरसेवक होते. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. असे असतानाही नगरसेवक पप्पू देशमुख यांनी “200 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून महापौर राखी कंचर्लावार यांनी राजीनामा द्यावा” अशा शीर्षकाची प्रेसनोट प्रसिद्धी माध्यमाना पाठविली.
लेखापरीक्षकांत त्रुटी निघाल्या म्हणजे गैरव्यवहारच झाला, असा आरोप करणे चुकीचे आहे. माध्यमात नियमित चर्चेत राहण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्याकडून न घडलेल्या गोष्टीचा बाऊ केला जात आहे. यामुळे महानगरपालिकेसह महापौरांची विनाकारण बदनामी केली जात आहे. भोजन पुरवठा, डबा, कचरा,प्रसिद्धीच्या कामात करोडो रुपयांचे मोठे घोटाळे झाले, असे भासवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम नगरसेवक पप्पू देशमुख करीत आहेत. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी उठसूट प्रेसनोट काढून बदनामी करणाऱ्या नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या आरोपावर जनताच उत्तर देईल.
त्रुट्या म्हणजे गैरव्यवहार??
आरोप करणाऱ्या नगरसेवकाने आधी महानगरपालिका अधिनियम पुस्तक वाचायला हवे. प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे कार्य आणि अधिकार हे समजून घ्यावे. स्वतःचा मूर्खपणा झाकण्यासाठी आरोप- प्रत्यारोप करणे म्हणजे मोठेपणा नव्हे. लेखा परीक्षण अहवाल हा प्रशासकीय विषय आहे. लेखापरीक्षकांत त्रुटी निघाल्या म्हणजे गैरव्यवहारच झाला, असा आरोप करणे चुकीचे आहे असे मतही राखी संजय कंचर्लावार, महापौर, यांनी व्यक्त केले आहे.