आटपाडीतील श्री सेवा हाॅस्पीटलविरुध्द तक्रार
गरीब कोरोना रुग्नावर उपचार करण्यास नकार
दिघंची/ वार्ताहर
सरकार कितीही सांगत असले तरी काही हाॅस्पीटलच अशी आहेत की गरीब कोरोना रुग्ण दिसताच उपचार करण्यास सपशेल नकार देतात. आणि तोच अनुभव दिघंचीच्या नवनाथ वसंत शिंदे यांना आला. डिपॉझिट भरल्याशिवाय सदरच्या या कोरोना रुग्नावर उपचार करण्यास आटपाडीच्या ‘श्री सेवा’ हाॅस्पीटलने करण्यास ठाम नकार दिला. शिंदे यांनी अखेरीस या हाॅस्पीटलविरुध्द प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली आहे.
या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, सुरेखा दत्तात्रय शिंदे या कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णास श्री सेवा हॉस्पीटलमध्ये 31मे च्या रात्री साडेआठ वाजता दाखल केले. पण चाळीस हजार रुपये डिपॉझिट भरल्याशिवाय रुग्नावर उपचारच करणार नाही आणि असे या हाॅस्पीटलमधून स्पष्टपणे सांगण्यात आले. नवनाथ शिंदे हे हाॅस्पीटलमध्ये पेशंट सोडून ‘कुणी उसने पैसे देतेय का’ यासाठी दिघंचीत आले. पण पैशाची तजबीज करीत असतानाच रात्री अकरा वाजता या हॉस्पिटलमधून फोन आला की, पैसे भरा नाही तर रुग्ण येथून हलवा. अखेरीस नवनाथ शिंदेंनी एक जूनच्या सकाळी सकाळी आटपाडी ग्रामीण रुग्नालयाच्या डॉ. तांबोळी यांना हात जोडून विनंती केली की सांगलीच्या सिव्हिल हाॅस्पीटलमध्ये तर या रुग्नावर उपचार करा, तिथे नाही जमले तर तर तुम्हीच या ग्रामीण रुग्णालयात कसेही करुन, सोय करुन या रुग्नावर उपचार करा अशी विनंती केली. रुग्नास आता अखेरीस आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहे.
चांगली सुसज्ज सेवा म्हणून गंभीर पेशंट आशेने मोठ्या हाॅस्पीटलमध्ये धाव घेते, तसेच आटपाडीचे श्री सेवा हाॅस्पीटल शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेत मोडत असूनही पैशाचीच मागणी करते आहे. अशा प्रसंगी रुग्नाचे हाल तर होतातच पण नातेवाईकांचीही त्रेधातिरपीट उडते. शासन एकीकडे कोणी कोरोना रुग्नावर उपचार करण्यास नकार देत असेल तर त्याच्यावर कारवाई करु असे सांगते, पण शासनाच्या याही आदेशाला केराची टोपली दाखवणारे काही हाॅस्पीटल्स आहेत.
पत्नी असलेल्या सुरेखा शिंदे रुग्ण, कोरोनाच्या रोगाने ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने सध्या अत्यव्यस्त तर आहेतच, शिवाय त्यांचे पती दत्तात्रय शिंदे, मुले व सासरेही त्यांचे कोरोना पाॅझिटीव्हने दिघंची कोव्हीड सेंटरमध्ये दाखल आहेत. कोरोनाने या संपूर्ण कुटुंबालाच येरबाडले आहे, आणि अशी अवस्था या गरीब कुटुंबियांची माहिती असूनही, या आटपाडीच्या श्री सेवा हाॅस्पीटलला तशी सांगूनही, त्यांनी अशाप्रसंगीही उपचार करण्यास नकार दिला. उलट शासनाच्या आरोग्य विमा योजनेत हे हाॅस्पीटल असूनही पैशाचीच मागणी करते आहे हे विशेष!
या रुग्नाचे नातेवाईक नवनाथ वसंत शिंदे यांनी अखेरीस
जिल्हा आरोग्य अधिकारी सांगली यांचेकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच सांगली जिल्हा परिषदेचे सीईओ, विटा प्रांताधिकारी,आटपाडीचे तहसीलदार, बीडीओ, आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षकांकडेही लेखी तक्रार दाखल केली आहे.
हणमंतराव देशमुख धावले देवदूतासारखे
सुरेखा दत्तात्रय शिंदे ही महिला दारोदारी मागून खाणाऱ्या डवरी समाजातील आहे. महिलेच्या आणि कुटुंबियांच्या पाठीशी आटपाडी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख अगदी देवदूतासारखे राहिले. त्यांना आरोग्य सेवा मिळवून दिली. या डवरी समाजाच्या (शिंदे) महिलेचा पती, मुले, सासराही दिघंचीच्या कोव्हीड सेंटरमध्ये कोरोनाने दाखल आहेत.या महिलेची ऑक्सिजन लेव्हल कमी आल्याने ती धोक्याच्या परिस्थितीत आहे. आटपाडीच्या श्री सेवा हाॅस्पीटलने अशावेळी पैशाचीच मागणी केल्याचा व्हिडिओही सोशल मिडियावर सद्या व्हायरल होत आहे.
-कांतीलाल कारळे पत्रकार यांचे पेजवरून