महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इ.१२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची आमची ठाम भूमिका राहिली आहे.
सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती, सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते.
तसेच १२वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे अशी मागणीही केंद्राकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी माझा विभाग कटिबद्ध आहे.
भविष्यात होणाऱ्या बोर्डाच्या व इतर महत्त्वाच्या परीक्षा लक्षात घेता केंद्राने शिक्षक आणि परीक्षार्थींचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे.
मागील वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूपच आव्हानात्मक होते. त्याला तोंड देत आपण अभ्यास सुरू ठेवल्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुढील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. काळजी घ्या, सुरक्षित राहा.