(मुंबई:- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 24 मे. 2021)
भारतीय वैद्यक संघटनेचे (आय एम ए) राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर नवज्योत सिंग धाईया यांनी रामदेवबाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मेडिकल डायलॉग्सने प्रकाशित केली आहे. बाबा रामदेव वर अनेक गंभीर आरोप यावेळी करण्यात आले आहेत. खरेतर हे आरोप या देशातल्या सर्व बाबा आणि बुवांना लागू होतात. कारण देशात कोव्हीड महामारी सारखी गंभीर परिस्थिती असताना या सर्व बाबा बुवांचे… डॉक्टर असल्याच्या थाटातले चाळे पेशंटच्या जिवाशी खेळत आहेत. बाबा रामदेव यांच्या वरील आरोपांची जी मालिका आहे ती जर आपण सर्व बाबा बुवांना लावली तर सर्व बाबा-बुवांवर, सर्व धर्माच्या गुरु-महाराजांवर एफआयआर दाखल होण्याची आवश्यकता आहे. रामदेव बाबांनी असे म्हटले आहे की, कोव्हीड झालेल्या पेशंटने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज नाही, मी सांगतो तो उपचार केला तर तो बरा होईल! अतिशय गंभीर स्वरूपाचे हे विधान पेशंटचा जीव घेणारे आहे. केंद्र सरकारने कोव्हीड रोगाबाबत ज्या सूचना जारी केलेल्या आहेत त्याचा सरळ सरळ भंग रामदेव बाबा करत आहे. सुळसुळाट झालेल्या अनेक बाबा-बुवांची मुक्ताफळे पाहू या. साध्वी प्रज्ञा सिंह …गोमुत्रामुळे मला कोरोनाची लागण झाली नाही. गोमुत्रामुळे कॅन्सर बरा होतो. स्वतःला मात्र हाॅस्पिटलात अॅडमिट करून घेतले!! श्री रविशंकर यांची सुदर्शन क्रिया कोव्हीडवर निष्प्रभ ठरल्याने इम्युनिटी वाढविण्यासाठी साखर बंद करण्याचा थोर सल्ला ते प्रवचनांतून देत आहेत आणि कोव्हीडला पळवुन लावण्याचा डाॅक्टरी उपद्व्याप करीत आहेत.
सद्गुरू जग्गी वासुदेव यांचे तर ऑनलाईन अंगारा-भंडारा दुकान आहे. रोगनाशक शक्ती असलेले!
डाॅ. झाकीर नाईक नावाचे यम्बीबीयस झालेले दवाह सोडुन दुवात घुसलेले स्वयंघोषीत सलाफी ‘मुबल्घ’ म्हणतात की समलिंगी संबंधी म्हणजे…’ मनोरूग्ण असलेले पापी..ज्यांना हा रोग होतो त्यामागील कारण म्हणजे पोर्नोग्राफी..त्यांना कुराण आणि सुन्नाह प्रमाणे फासावर लटकावणे हाच उपाय..’ एक डाॅक्टर असे सह्रदयपणे रूग्णसेवा अर्पण करताना पाहून तमाम ‘मुरीदांची’ रांग त्याच्यामागे उभी राहते. या भारतात डाॅक्टरांपेक्षा दाढीवाल्यांवर जनतेचा भक्तीपूर्ण विश्वास आहे. ते जर म्हणाले की “शेण खा..मुत्रप्राशन करा ” तर साश्रु नयनाने तमाम श्रद्धाळू मटकन गिळून टाकतात.
हे सारे घडविण्यात या देशातील डाॅक्टरांचे योगदान मोठे आहे. कारण या बेफाम-बेसुमार वाढलेल्या बुवाबाबांच्या प्रजातीस वेळेवर खुडुन न टाकण्याचे “पाप” त्यांच्या पदरात पडून आहे. अजुनही दाढीवाल्यांची तळी उचलण्याचे आध्यात्मिक कार्य डाॅक्टरांचीच एक फळी रात्रंदिन करीत आहे. त्यात सर्व रोग बरे करण्याच्या दाव्यांच्या फालतुपचाराचा जोरदार प्रचारही चालू आहे. बाबा रामदेव असेही म्हणतात की covid-19 झालेल्या पेशंटना श्वास नीट घेण्याची अक्कल नसते म्हणून ते मरतात आणि त्यामुळेच स्मशानभूमी मध्ये गर्दी होत आहे, त्यांच्यामुळेच ऑक्सिजनचा साठा कमी पडू लागलेला आहे असे एफआयआर मध्ये नमूद करण्यात आले आहे. एखाद्या बुवा आणि महाराजांनी या देशात वैद्यकीय व्यवस्था आणि ऑक्सिजनचा पुरवठा कसा असावा हे सांगावे या सारखा मोठा विनोद कोणता नाही. सरकार विरोधात एक शब्दही बोलायचा नाही आणि लोकांच्या धार्मिक मानसिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे यासारखे संवेदनाहीन राजकारण या देशात बुवा-महाराज नेहमीच करत आलेले आहेत. ऑक्सीजन कमी पडला तर ऑक्सिजन लावण्याऐवजी अनुलोम-विलोम प्राणायाम आणि कपालभाती असले प्रकार करून ऑक्सिजन वाढवा असा सल्ला देणे म्हणजे ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट याचा संपूर्ण भंग होईल असे बेकायदेशीर कृत्य होय. पण त्याहीपेक्षा ऑक्सिजन देण्याचे वैद्यकीय विज्ञान पायदळी तुडवण्याचे काम हे बाबा, बुवा, महाराज करत आहेत. 7002 टन ऑक्सिजन रोज निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतात कोविड रोगाच्या काळात 6000 टन ऑक्सिजन रोज गरजेचे असताना ऑक्सिजन कमी का होत आहे? का कमी पडत आहे? याचा शोध बाबा-बुवा घेत नाहीत. कारण यामध्ये केंद्रीय सरकारचे मोठे अपयश दडलेले आहे. निर्मिती व वितरण याच्या मध्ये प्रचंड मोठा गोंधळ आहे हे याचं प्रमुख कारण आहे. ते लपवण्यासाठी अनुलोम-कपालभाती असले काहीतरी प्रकार करायला सांगणे म्हणजे जनतेला उल्लू बनवणे आहे. रामदेव बाबाने असेच डॉक्टरांबद्दलही अनुद्गार काढलेले आहेत. वाटेल तशी ट्रीटमेंट डॉक्टर देतात म्हणून पेशंट जीवाला मुकतात अशा पद्धतीने जेव्हा एखादा बाबा बोलतो तेव्हा तो या देशातल्या वैद्यकीय यंत्रणेला मूर्ख आणि बिनडोक घोषित करतो. आणि… त्याच्या भोंदू औषधाचे अनावरण या देशाचे आरोग्य मंत्री करतात, यासारखा विरोधाभास कोणता नसेल. आजच्या घडीपर्यंत जवळपास हजारच्या वर डॉक्टरांनी कोव्हिड पेशंटवर उपचार करताना आपले प्राण गमावले आहेत. त्याची कोणतीही दखल इथल्या समाजाने घेतलेली नाही. सन्मानाची तर गोष्ट सोडा..पण या दाढीवाल्या बाबा-बुवांचा मात्र सन्मान इथली प्रजा दिवस-रात्र करीत आली आहे. कारण देवधर्म- आणि अध्यात्माच्या नावाखाली त्यांची मती कुंठित करून टाकलेली आहे. जवळपास दहा लाख डॉक्टर या देशात आज करोनाची महामारी दूर व्हावी म्हणून खपत आहेत. पण दाढीवाल्या बुवा आणि बाबांनी या सर्व डॉक्टरांना अक्कल नसल्याचे जाहीर करून टाकले आहे. हे बरे झाले की आय. एम. ए.च्या डॉक्टर दहिया यांनी गुन्हा दाखल केला. पण तो खूप उशिरा दाखल केला आहे. गेले अनेक वर्षे या देशातल्या बुवा-बाबांनी आरोग्य व्यवस्था आपलीच मक्तेदारी आहे अशा थाटात लोकांवर उघड उघडपणे उपचार देखील सुरू केलेले आहेत. या बाबांकडे कॅन्सर वर उपाय आहेत, एड्सवर उपाय आहेत, कोरोना वर उपाय आहेत, सर्व असाध्य रोगांवर उपाय आहेत आणि तरीही इथली प्रजा या सर्व रोगांमुळे मरते आहे !! याचे सरकारला काही देणे-घेणे नाही. कारण या बाबांमुळे त्यांचे राजकारण चांगलेच शिजते आहे.
ज्यांना वैद्यकीय ज्ञानातली माहिती नाही असे बुवा, महाराज या देशात जेव्हा रोग बरे करायला लागतात तेव्हा समजावे हा देश रोगट मानसिकतेचा बनलेला आहे. या देशातील लाखो डॉक्टरांनी बाबा-बुवांच्या या बालिश आणि जीवघेण्या चाळ्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने आता त्यांना मानहानी भोगावी लागत आहे. ज्यावेळी या बाबा-बुवा महाराजांचे पीक आले होते आणि ते वाटेल ते उपाय करत सुटले होते तेव्हा हिंदू संस्कृतीच्या नावाखाली याच डॉक्टरांनी बाबा-बुवा यांच्या या तमाशाकडे डोळेझाक केलेली होती. कानाडोळा केला होता. आता जेव्हा महामारीच्या काळात दिवस-रात्र सेवा देत मरणाला सामोरे जात असताना डॉक्टरांनाच नावे ठेवणारे धाडस हे बाबा-बुवा करू लागले तेव्हा या देशातल्या डॉक्टरांना जाग आलेली आहे. ती सर्वांनाच आलीय असेही नाही. कारण हिंदू संस्कृतीच्या अचाट भक्तीच्या भ्रमात अडकलेल्या डॉक्टरांची एक फळी आहे. हे याबाबत बुवांच्या दाढ्या पकडून त्यांचे गुणगाण गात, शरणागती पत्करून, भक्त बनलेले आहेत. आणि त्यांचे हे आंधळेपण इथल्या गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही रुग्णांच्या जीवावर उठले आहे. आजही जग्गी वासुदेव सारखा सद्गुरु भस्म विकून आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याचा खुलेआम दावा करतो तेव्हा कोणत्याही डॉक्टर त्या विरोधात ब्र काढत नाही. खुद्द अनेक डॉक्टर या बाबा-बुवा-महाराजांचे औषधांचे प्रॉडक्टस् आंधळेपणाने विकत आहेत. अगदी गोमुत्र, शेण आणि गोवऱ्या विकणारे हे डॉक्टर आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि तत्सम इतर पॅथीच्या संघटनांनी या बाबा-बुवा-महाराजांच्या वैद्यकीय चाळ्यांकडे दुर्लक्ष का केले आहे हे स्पष्ट व्हायला हवे आहे. डॉक्टर श्रीराम लागू यांनी विशिष्ट औषधाची जाहिरात केली म्हणून त्यावेळी मेडिकल कौन्सिलने लगेच त्यांच्यावर कारवाई केली होती. हीच तत्परता बुवा-बाबांच्या बाबतीत करताना मात्र तेच कौंसिल लुळे पडते. हे धर्मांध आणि तथाकथित अध्यात्म भक्तीचे आंधळे राजकारण कोव्हीडला बळी पडलेल्या मृत शरीरांना गंगेत फेकण्यापर्यंतच्या खालच्या पातळीवर पोहोचले आहे. शिक्षण विज्ञानाचे घ्यायचे आणि गुणगान संस्कृतीचे गायचे या दुटप्पीपणाने या देशातल्या आरोग्य व्यवस्थेचा पार बोजवारा उडवून टाकलेला आहे. जेव्हा सारे काही संस्कृतीच्या चष्म्यातून मोजले जाऊ लागते तेव्हा तो देश म्हणजे एक डबके बनते. आरोग्य व्यवस्था ही विज्ञानाने लोकांचे जीव वाचवून तगडी बनवलेली आहे. ती आज संपूर्ण मोडकळीस आणून जंगलातली रानटी पद्धत लोकांच्या माथी मारणे यासारखा अमानुषपणा कोणता नसेल.
हा लढा बुवा-महाराज-बाबांच्या उपचार पद्धती विरुद्ध वैज्ञानिक उपचार पद्धती असा आहे. त्याला राजकारणाची झालर आहे. आणि म्हणूनच ती फार कठीण बनली आहे. विवेकाचा आवाज बुलंद करूनच ती मोडून काढणं एवढंच हातात फक्त आता शिल्लक राहिलं आहे…..आणि असे अनेक डॉक्टर नवज्योत सिंग धाईयां सारखे धैर्याने पुढे आले तरच हे घडेल अशी माहिती – डाॅ. प्रदीप पाटील Pradeep Patil सांगली यांनी दिली.