जगतसिंधपूर/
प्रशासकीय सेवेतील एका महिलेने कोरोना नियमांचा भंग करत लग्न सोहळ्यात डान्स केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला अधिकाऱ्याच्या भावाचे लग्न होते. यावेळी कोरोना नियमांना धाब्यावर बसवत महिला अधिकाऱ्याने डान्स केला. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी ओडिशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लोकांकडून नियमांचा भंग झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. पण, एका अधिकाऱ्यानेच कोरोना नियमांचा फज्जा उडवल्याचं पाहायला मिळालं आहे.
यात महिलेने मास्क घातलेला नाही. जयपूरचे जिल्हाधिकारी चक्रवर्ती सिंह राठोड यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, महिला तहसिलदार सध्या सुट्टीवर आहे. त्या जेव्हा पुन्हा कामावर येतील, तेव्हा त्यांना स्पष्टीकरण मागण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. सध्या परिस्थिती गंभीर आहे. कोणालाही कोरोना नियमांचे उल्लंघन करता येणार नाही. मग तो अधिकारी असो किंवा सामान्य नागरिक.
महिला अधिकारी सध्या सुकिंडाची (Sukinda) तहसीलदार आहे. राज्य सरकारने लग्न समारंभासाठी केवळ 25 लोकांच्या उपस्थितीची अट ठेवली आहे, असे असताना अधिकाऱ्याकडून नियम पाळले गेले नाहीत. लग्न समारंभात अनेकांनी मास्क वापरला नव्हता. महिला अधिकारी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकली नाही. महिला अधिकारी आपल्या भावाच्या लग्नासाठी 21 मेला जगतसिंदपूर जिल्ह्यामध्ये गेली होती. कोरोना संसर्गाची पर्वा न करता रात्रीच्यावेळी लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता.