- ऍड. असीम सरोदे यांच्या स्पष्ट प्रतिक्रिया
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 23 मे 2021.
अशास्त्रीय वक्तव्ये करून लोकांची दिशाभूल करणारा व्यापारी रामदेव बाबा आता म्हणतो ‘ अॅलोपॅथी एक ऐसी स्टूपीड और दिवालिया सायन्स है ‘. अशी अडाणी वक्तव्ये करण्याची ताकद मिळण्याचे याचे ‘ केंद्र ‘ आता सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्याबद्दल मी लिहीत नाही. या रामदेव वर कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन ने केली आहे. सगळ्यात प्रगतीशिल वैद्यकीय शास्त्र म्हणून अॅलोपॅथी चा उल्लेख करावा लागेल. अर्थात प्रत्येक औषध पद्धतीच्या व प्रत्येक पॅथीच्या काही मर्यादा असतात. अॅलोपॅथीच्या मर्यादा सगळ्यात कमी आहेत. कुणाला कोणती पॅथी निवडायची हे स्वातंत्र्य आहे. एखाद्या पॅथीचा पंचनामा करून वैज्ञानिक व वैद्यकीय दृष्टीकोनातून चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य आहे पण अभ्यासपूर्ण पद्धतीने तसे विश्लेषण चांगल्या भाषेत व तटस्थपणे करावे लागेल. दुसरे म्हणजे हा रामदेव एक अत्यंत चलाख, धूर्त, संधीसाधू व्यापारी आहे. आपली औषधे विकली जावीत म्हणून इतर औषधे, इतर पॅथी यांच्याबद्दल हा योग्य वेळ साधून संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करतोय.
यांच्या डोक्यावर कुणाचा राजकीय वरदहस्त आहे हे सगळ्यांना माहिती असल्याने मी त्याबद्दल बोलत नाही. एकाच वेळी सुमार दर्जाच्या माणसांनी सर्वोच्च स्थानं व्यापली आहेत आणि रामदेव सारख्या तशाच तद्दन, टुकार लोकांनी भारताला घेरले आहे. मागे सुद्धा करोना परिस्थितीचा व लोकांच्या मनातील भीतीच्या धंदा करण्याचा डाव या रामदेवने खेळला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन याला हाताशी धरून याच्या टोळीने ‘कोरोनील’ मुळे करोना बरा होतो असे जाहीर कार्यक्रम व पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. विशेष म्हणजे कोरोनील बाबत खोटा दावा करण्याबद्दल रामदेव व त्याचा साथीदार बाळकृष्ण यांच्या विरुद्ध महाराष्ट्रातील एकमेव खटला जुन्नर येथील न्यायालयात सुरू आहे.
साथरोग प्रतिबंध कायद्या अंतर्गत खरे तर रामदेव आणि बाळकृष्ण व टोळीवर गुन्हा दाखल होण्याची गरज आहे.