विशेष प्रतिनिधी/संजय होवाळ
पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी वेषांतर करुन पोलिसांचा सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेला कामाचा रवैया जाणून घेतला. यात आयुक्तांना पिंपरी पोलीस ठाण्यात अतिशय वाईट अनुभव आला. कोरोना साथीसारख्या संवेदनशील परिस्थितीतही पोलीस नागरिकांना त्यांच्या अडचणींमध्ये कशी मदत करतात हे आयुक्तांनी या वेषांतर दौ-यात जाणून घेतले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चेहऱ्यावर दाट झुबकेदार दाढी, डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग लावून त्यावर पांढरी गोल टोपी परिधान केली. सलवार कुर्ता आणि मास्क असा वेष परिधान करून आयुक्त बनले ‘जमालखान कमालखान पठाण’. तर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे बनल्या त्यांच्या बेगम.
वेषांतर केलेले हे पठाण दांपत्य पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावर उतरले. सुरुवातीला आयुक्तांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला. ‘आमच्या शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर तब्बल आठ हजार रुपये सांगितले’, अशी तक्रार त्यांनी केली. नियंत्रण कक्षातून ही माहिती पिंपरी पोलिसांना देण्यात आली. पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी जाण्याऐवजी तक्रारदार पठाण यांनाच पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.