जिद्दीच्या जोरावर केले कोविड हॉस्पिटल सुरू, उमेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश!
पुणे – संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, म्हणून रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पुण्यातील धानोरी येथे ५३ बेडचे हॉस्पिटल सुरू केले. हॉस्पिटलला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कोविड – १९ हॉस्पिटल असे त्यांनी नाव दिले.
याबाबत बोलताना उमेश चव्हाण म्हणाले की, एकीकडे बेड नाहीत, औषध नाही अश्या परिस्थितीत लोक आजाराला घाबरण्यापेक्षा उपचार मिळत नाहीत, याप्रकाराला घाबरून जात आहेत. यामध्ये तरुण रुग्णांनाच्या मृत्यूनंतर सगळीकडे भीतीची लाट पसरली आहे. ज्यावेळी प्रयत्न करूनही बेड उपलब्ध होतच नाहीत हे लक्षात आल्यानंतर आम्ही स्वतःचे हॉस्पिटल निर्माण करण्याचे ठरविले. यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
जवळचे मित्र विकास साठे, शांताराम खलसे, श्रीराम पाटील, दशरथ माटवणकर, अर्चना प्रधान यांनी मदतीचा हात पुढे केला, तर प्रसंगी उमेश चव्हाण यांनी स्वतःचे घरातील पत्नी आणि आईचे पस्तीस तोळे दागिने गहान ठेऊन तीस लाखांची जुळवाजुळव करून हे हॉस्पिटल अल्पावधीत म्हणजे अगदी सात दिवसात उभे केले.
डॉ. सलीम आळतेकर, डॉ. किशोर चिपोळे, गिरीश घाग, कुणाल टिंगरे, अपर्णा साठे यांनी हे हॉस्पिटल उभारण्यात मोलाची कामगिरी बजावली. यामध्ये पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती आणि पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे तसेच डॉ. अमोल देवळेकर यांनी या हॉस्पिटल उभारण्यासाठी केलेली मदत अवर्णनीय अशीच आहे.
रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे रुग्णांना इतर रुग्णालयात सेवा देणाऱ्या रुग्ण हक्क परिषदेने निर्माण केलेले छत्रपती शिवाजी महाराज कोविड – १९ हॉस्पिटल समाजात प्रेरणादायी कार्य म्हणून राज्यात चर्चेत असून उमेश चव्हाण यांच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.