The Postman source
बंधन बँकचे संस्थापक चंद्रशेखर घोष यांचा जन्म बांगलादेशच्या निर्वासीत कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे एक मिठाईचे दुकान होते. चंद्रशेखर घोष यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी त्यांच्या वडीलांनी भरपूर हाल सोसले. कसेबसे त्यांनी घोष यांना ढाका विद्यापीठात सांख्यिकीच्या पदवी शिक्षणासाठी पाठवले.
१९८५ मध्ये त्यांनी बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय विकास प्रतिनिधी असलेल्या BRAC साठी काम करण्यास सुरुवात केली.
संस्थेने त्यांना प्रशिक्षण दिले आणि क्षेत्र अधिकारी म्हणुन नेमणूक केली. त्यांची नेमणूक झालेले क्षेत्र अगदी गरीब असल्याने त्यांना तेथील परिस्थितीचे अधिक बारकाईने निरीक्षण करण्याची संधी मिळाली. नंतर त्यांनी अनेक सेवाभावी संस्थेत काम केले.
याच वेळी त्यांचा संबंध लघुकर्ज वाटपाच्या विषयाशी आला. पुढचे काही दिवस ते लघुकर्जाच्या बारकाव्यांचा अभ्यास करु लागले. पुरेशा गोष्टी कळाल्या तेव्हा त्यांनी पश्चिम बंगालमध्ये बंधनची स्थापना केली.
पश्चिम बंगालची एकूण आर्थिक परिस्थिती आणि तिथे लघुकर्ज वाटपाची असलेली गरज त्यांच्या त्यावेळी लक्षात आली.
एक स्वयंसेवी संस्था म्हणुन त्यांनी बंधनचे काम २००१ मध्ये सुरु केले. कलकत्त्यामधील कोन्नागर नावाच्या एका छोट्या गावात त्यांनी गरिबांना लहान-सहान कर्ज देण्यास सुरुवात केली.
यासाठी लागणारे २ लाख रुपयांचे भांडवल त्यांनी १,७५,००० रुपये कर्ज काढून आणि २५,००० रुपये बहिण आणि चुलत भाऊ यांच्याकडून घेऊन उभा केले होते.
सुरूवातीच्या काळात घोष यांच्याकडे फक्त २ कर्मचारी होते. पार्थ समंता, आणि फातिक बेरा. त्यांनी अगदी १००० रुपयांपासून कर्ज देण्यास सुरुवात केली. १५% व्याजदराने हे कर्ज देण्यात आले होते. काहीही गहाण न ठेवता कर्ज दिले जाते ही संकल्पनाच तेथील लोकांसाठी अगदी नवीन होती.
२०१०च्या उत्तरार्धात कर्ज वसुल करण्यासाठी सावकारांनी सुरु केलेल्या जाचक पद्धती
अनेक कर्जदारांच्या आत्महत्येचे कारण बनल्या होत्या. सगळ्यात जास्त लघुकर्ज देणाऱ्या संस्था असलेल्या आंध्रप्रदेश सरकारला या संस्थावर नियंत्रण आणण्यासाठी अतिशय कडक अध्यादेश काढावा लागला. अध्यादेशाने राज्यातील कर्जवाटप संस्थांच्या कामावर नियंत्रण आणले. शेजारील राज्यातील संस्थांना सुध्दा या अध्यादेशाचा फटका बसला.
वसुली दर ९९ टक्के वरुन चक्क २० टक्क्यांवर आला. अशा या धोक्याच्या काळातही भरभराटीस आलेली संस्था होती बंधन. चंद्रशेखर घोष यांनी स्थापन केलेली ही संस्था मुख्यत: लघु कर्ज आवश्यक असणाऱ्या जनतेसाठीच स्थापन केली होती.
आंध्रप्रदेशमध्ये जास्त शाखा नसल्याने बंधनचा फायदाच झाला.
तसेच संस्थांवर झालेल्या कारवाईमुळे मोठ्या बँकांनी या संस्थांना पैसे देणे बंद केले. अशा वेळी बंधनला मात्र पैसे भेटत होते. कर्जदारांची संख्या वाढत होती. अधिक कर्ज दिले जात होते. काही जण याच्या मागे चंद्रशेखर घोष यांच्या चाणाक्षपणाला देतात.
बाजाराचे अगदी योग्य मुल्यमापन केलेल्या चंद्रशेखर घोष यांनी बंधनची नौका लघुकर्ज वाटप संस्थांसाठी वादळ ठरलेल्या या वेळेतुन अगदी यशस्वीपणे पार केली.
२०१३मध्ये आपल्या संस्थेचं रुपांतर बँकेत करण्यासाठी २०१३मध्ये बंधन संस्थेने आरबीआयला परवानगीसाठी अर्ज केला. २६ अर्जदारांपैकी फक्त २ अर्ज मान्य करण्यात आले, त्यात एक नाव होते बंधन बँक.
२३ ऑगस्ट,२०१५ ला बंधन बँकने आपले कामकाज सुरू केले. बंधन ही पुर्णपणे बँकेत रुपांतरीत होणारी पहिलीच लघुकर्ज वाटप संस्था असावी. ३१ मार्च २०१४ पर्यंत बंधनचे कर्जपुस्तक ६२०० करोड रुपये असुन ५.४ दशलक्ष एवढे कर्जदार बँकेशी संलग्न आहेत.
कंपनीत १३,००० कर्मचारी असुन २२ राज्यात त्यांच्या २०१६ शाखा कार्यरत आहेत. एवढेच नव्हे तर जागतिक बँकेचा भाग असलेल्या आंतरराष्ट्रीय वाणिज्य महामंडळ या बँकेचे १०.९३ टक्के भागधारक आहेत. बँकेचे भांडवल यावेळी ११०० करोड रुपये एवढे होते.
एवढ्या लवकर बँकिंग क्षेत्रात पदार्पण करण्याची परवानगी बंधन बँकेला मिळाली याचे कारण आहे त्यांची सुरुवातीपासून असलेली अप्रतिम कामगिरी. अगदी छोट्या छोट्या प्रमाणात कर्ज देणे ही बंधन बँकेची ओळख आहे.
भारताच्या पुर्व भागात बंधन बँकेने लघु कर्ज वाटपाच्या शर्यतीत कित्येक मोठ्या नावांना मागे टाकले आहे. छोट्या छोट्या कर्जाची वाटप करुन कित्येक लहान शेतकऱ्यांना, उद्योगांना उभारी देण्याचे काम बंधन करत आहे.
आर्थिक सर्वसमावेशकतेच्या तत्त्वाचे अगदी काटेकोरपणे पालन करत असलेल्या बंधनला आरबीआयने काहीही संकोच न ठेवता बँकिंगची परवानगी दिली. आरबीआयच्या निर्णयानुसार मालकी हक्क असलेल्या कंपनीचे शेअर्स ४० टक्क्यापेक्षा जास्त असताना बंधन बँकेवर नवीन शाखा उघडण्यासाठी बंदी घालण्यात आली होती.
यावेळी बंधन फायनांशियल होल्डिंग या बंधनचे मालकी हक्क असलेल्या कंपनीने आपले शेअर्स विकुन टक्केवारी ४० टक्क्यांवर आणली.
मुंबईत नविन बँकच्या उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी बोलताना घोष म्हटले की,
“नव्या बँकेचा मुख्य उद्देश कमी उत्पन्न असलेल्या कर्जदारांवरच असणार आहे. गरिबांशी असलेली माझी निष्ठा तशीच असणार आहे. माझ्या केंद्रस्थानी नेहमीच ते राहणार आहेत. बँकेत रुपांतर झाल्याने आम्ही आमच्या अधिक सेवा आता त्यांना देऊ शकू.”
आजही ते आपल्या त्या शब्दांचे पालन करताना दिसत आहेत. २३ जून, २०२० रोजी बंधनच्या कर्जवाटपातील ६० टक्के पेक्षाही जास्त वाटा लघुकर्ज वाटपाचा आहे. ज्या ग्राहक वर्गाला केंद्रस्थानी ठेऊन सुरुवात केली होती त्याच वर्गासाठी घोष आजही काम करत आहेत.
५ वर्षात बंधन बँकेने त्यांचे कर्जपुस्तक ७४,३०० करोड रुपयांवर नेले आहे, ६०,६०० करोड रुपये जमा आहेत. जागतिक गुंतवणूकदार आज बंधनमध्ये गुंतवणूक करण्यास सरसावत आहेत.
एवढं मोठं होऊन सुद्धा बंधन बँकेने आपले मुख्य उद्दीष्ट असलेल्या लघुकर्जांकडे दुर्लक्ष केले नाही. २०.३१ दशलक्ष ग्राहकांपैकी १५.४६ दशलक्ष ग्राहक आजही लघुउद्योग करणारे ग्राहक आहेत. ७४,३०० करोड रुपयांपैकी ४७,५०० करोड रुपये लघु उद्योजकांना कर्ज म्हणून दिले आहेत.
लघु कर्जांवर अवलंबुन असणे बंधनसाठी शाप आणि वरदान दोन्हीही ठरू शकते. कोव्हिड-१९मुळे लघु उद्योगांच्या घटलेल्या कमाईमुळे कर्जाच्या वसुलीची प्रक्रिया अधिकच जटील होउन बसणार आहे. अशावेळी बंधन बँकेसमोर आपल्या ग्राहक वर्गाला सांभाळणे जिकरीचे काम असणार आहे.
आतापर्यंत आपल्या चाणाक्ष बुद्धीने सगळ्या संकटांना तोंड देत आलेले चंद्रशेखर घोष हे या समस्येला कसं तोंड देतात हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.