सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा पुढे ढकलली.
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १४ एप्रिल २०२१
: वाढत्या कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला. सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेऊन गुण दिले जातील. कामगिरीच्या आधारे दिलेल्या गुणांविषयी ज्यांना हरकत असेल त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र ही परीक्षा कधी होणार तसेच बारावीच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक या संदर्भातले निर्णय १ जून २०२१ रोजी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जाहीर केले जातील. सीबीएसई बोर्डाचे अधिकारी १ जून २०२१ रोजी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतील; अशी माहिती केंद्र सरकारने दिली.
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिस्थिती गंभीर आहे. अशा वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलावून त्यांची परीक्षा घेणे धोक्याचे ठरू शकते. या निमित्ताने होणाऱ्या प्रवासात विद्यार्थ्यांना कोरोनाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचाही निर्णय घेतला.