गेल्या सत्तर वर्षात सरकारी आरोग्य सेवा कमकुवत ठरल्यानेच खाजगी हॉस्पिटलने खिशावर दरोडा टाकून लोकांची लूट केली – उमेश चव्हाण
पुणे – देश पारतंत्र्यात असताना सरकारच्या मालकीची चांगली हॉस्पिटल निर्माण झाली. ही सर्व सरकारी रुग्णालये आजही लोकांना उत्तमरित्या सेवा देत आहेत. मात्र गेल्या सत्तर वर्षात ज्या पक्षांची सरकारे सत्तेवर आली त्यापैकी कोणीही आरोग्य सेवेला केंद्रबिंदू मानून काम केले नाही म्हणूनच खाजगी हॉस्पिटल चे देशात पेव फुटलेले दिसते त्यामुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्यांना आपली घरे आणि संपत्ती विकल्या शिवाय पर्याय उरत नसल्याचे मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
रुग्ण हक्क परिषद या संघटनेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्यासह किसान काँग्रेसचे हनुमंत पवार आदर्श सरपंच सुहास पांचाळ सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय लोहार, सल्लागार प्राचार्य वृंदा हजारे, नाशिक जिल्हा अध्यक्ष सारिका नागरे पुणे शहर उपाध्यक्ष यशस्विनी नवघणे उपस्थित होत्या.
उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, सरकारी रुग्णालयांची दुरावस्था आणि धर्मादाय रुग्णालयांची मनमानी खाजगी हॉस्पिटलमध्ये होणारी लूट लक्षात घेता, आता सहकारी सहकारी तत्त्वावरील हॉस्पिटलची निर्मिती करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांना मोफत उपचार देणारे हॉस्पिटल रुग्ण हक्क परिषद तयार करीत आहे.
हनुमंत पवार म्हणाले की, औषध दुकाने रुग्णालयांचे चालक-मालक सर्व डॉक्टर्स परिचारिका वैद्यकीय कर्मचारी रुग्णवाहिका चालक- मालक आणि हॉस्पिटल क्षेत्राशी संबंधित सर्वच मंडळींच्या संघटना या देशात मजबूत आहेत मात्र ज्या रुग्णांच्या जीवावर हे सर्व सुरू आहे त्या रुग्णांची संघटना भारतात अस्तित्वात नव्हती ज्यांची संघटन नसते त्यांची लूट होते हे सूत्र लक्षात घेऊन भारतातच नव्हे तर आशिया खंडातील पहिली संघटना म्हणून रुग्णहक्क परिषदेचा उल्लेख भविष्यात इतिहासात नोंद झालेला असेल.
यावेळी रुग्णात परिषदेने तीन वर्षात केलेल्या कार्याचा आढावा आणि ध्येय उद्दिष्ट स्पष्ट केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मंचावर उपस्थित मान्यवरांनी केले. वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांसाठी स्नेह भोजन व स्नेहमेळाव्याचे ही आयोजन करण्यात आले होते.
रुग्ण हक्क परिषद ए चा चौथा वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन सचिव दीपक पवार उपसचिव गिरीष घाग पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अपर्णा साठे, मुख्य समन्वयक नम्रता पवार कार्यालयीन संपर्क प्रमुख दिव्या कोणतं आणि आरती कलाम यांनी विशेष परिश्रम घेतले.