सरपंचाचे सदस्यत्व रद्द : शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले???
गडचिरोली प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २५ मार्च २०२१
गडचिरोली तालुक्यातील पुलखल ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रणित गटाने सत्ता स्थापन केली होती.मात्र सरपंच जयश्री दिपक कन्नाके यांचे पती दिपक कन्नाके यांचे राहते घर हे शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्याने जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी सरपंच जयश्री कन्नाके यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द केले असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या व ग्रामपंचायत सदस्य सावित्री तुकाराम गेडाम यांनी सरपंच जयश्री कन्नाके यांचे पती दिपक कन्नाके यांचे राहते घर हे शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करुन राहत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यांना सदस्य पदावरून अनर्ह करावे अशी तक्रार दाखल केली होती.
जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी याबाबत गडचिरोली तहसीलदार यांचे मार्फत संबंधित अतिक्रमणाची शहानिशा करून तसेच सरपंच जयश्री कन्नाके यांना बाजू मांडण्यासाठी संधी देवून सर्वोच्च न्यायालयाने जनाबाई विरुद्ध अपर आयुक्त याप्रकरणाचा दाखल देत ग्रामपंचायत सदस्य पदावर कार्यरत राहण्यासाठी अनर्ह करण्यात येत असल्याचे आदेश २४ मार्च रोजी जारी केला आहे.
पुलखल ग्रामपंचायतींमध्ये भाजप प्रणित गटाचे चार तर शेतकरी कामगार पक्ष समर्थीत गटाचे तीन सदस्य निवडून आले होते. आदिवासी महिले करीता सरपंच पद राखीव असलेल्या पुलखल ग्रामपंचायतीचे राजकारण या आदेशामुळे ढवळून निघाले आहे.तर दुसरीकडे जिल्ह्यातील अतिक्रमण केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये खळबळ माजली आहे. असे बरेच अतिक्रमण खरपुंडी ग्रामपंचायत आणि परिसरातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. या बाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पराकोटीचे लक्ष देण्याची गरज आहे.