सामना – रोखठोक –मंदिरात देव आहेत काय? तहानलेल्यांना पाणी नाकारणारे ‘भक्त”??
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम
दि. २२ मार्च २०२१
पंतप्रधान मोदी पाकिस्तानला कोविड लस पुरवून माणुसकी दाखवतात. त्याकामी टीका सहन करतात. त्याच वेळी उत्तर प्रदेशातील एका मंदिरात तहानलेल्या मुसलमान मुलास पाणी नाकारले जाते, हे कसले रामराज्य? जेथे पाणी नाकारले त्या मंदिरात देवांचे वास्तव्य नसावे.?
जात आणि धर्माचे भूत आपल्या देशातून जाईल असे दिसत नाही. जात आणि धर्म आरक्षण, राखीव जागांच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. आपला देश महान असल्याचे भाषणात नेहमीच सांगितले जाते. पण त्या महानपणास जातीयतेचा डाग लावून काही लोक देशाला खुजे करीत असतात. अशाच एका प्रकरणाने देशाच्या महानतेवर प्रश्नचिन्ह लागले. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जे घडले ते धक्कादायक आहे. येथील एका मंदिरात तहानलेला एक लहान मुलगा पाणी पिण्यास गेला. नळाच्या तोटीतून तो दोन घोट पाणी प्यायला, तोच मंदिरातील एक-दोन लोक धावत येऊन त्या मुलास त्यांनी निर्घृणपणे मारले. त्या मुलास मारत असतानाचा एक व्हिडीओ तयार करून ‘व्हायरल’ केला. त्या तहानलेल्या लहान मुलास का मारले? तर तो धर्माने मुसलमान होता. त्याचा गुन्हा असा की, तो मुसलमान असूनही तहान भागविण्यासाठी हिंदूंच्या मंदिरात गेला. मंदिराबाहेर एक बोर्ड आधीच लागला होता. मुस्लिमांना आतमध्ये प्रवेश नाही! बस्स. हा जणू देवाचाच आदेश होता की, तहानेने तडफडणाऱ्या मुलांनाही मंदिरात दोन घोट पाण्यासाठी प्रवेश द्यायचा नाही. ??भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी हाच खरा धर्म असल्याचे नेहमीच सांगितले गेले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला चवदार तळय़ाचा सत्याग्रह केला. दलितांना पाणवठय़ावर येण्यास बंदी होती. त्या विरोधात हे बंड होते. पाण्यास जातही असते हे डॉ. आंबेडकरांनी तेव्हा सांगितले. आता पाण्यास धर्मही असल्याचे त्या मुसलमान मुलाने दाखवून दिले अशा घटना घडतात तर मग हे सरकार कोणत्या हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करीत आहे? असा प्रश्न निर्माण होतो. हिच सहिष्णुता हिंदू धर्माचा सगळय़ात मोठा अलंकार. ?? अशा घटना समोर येतात तेव्हा तो अलंकार खोटा ठरतो. हिंदू समाजातील पददलित, गरीब लोक मोठय़ा प्रमाणावर धर्मांतरे करतात. आदिवासी पाडय़ांवर ख्रिश्चन मिशनरी जातात व त्या अशिक्षित लोकांचा बुद्धिभेद करतात. अशा वेळी त्या मिशनऱ्याना ओडिशाच्या जंगलात जाळून मारणारे लोक आपल्याच धर्मात निर्माण झाले?? व त्या जाळणाऱ्याचा जाहीर गौरव करणारे लोकही पाहिले. ‘लव्ह जिहाद’ “विरोधात वातावरण तयार करणे, गोमांस प्रकरणी हिंसाचार घडवणे हे आता रोजचेच झाले आहे. पण हे सर्व करणारे आणि त्या कृत्याचे समर्थन करणारे आता तहानलेल्या मुस्लिम मुलास, तो मंदिरात पाणी प्यायला म्हणून जी मारहाण केली गेली त्या घटनेचेही समर्थन करणार आहेत का?
प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी या ‘जय श्रीराम’चा नारा देत नाहीत, त्या हिंदूविरोधी आहेत, ??असा प्रचार सुरू आहे. पण हिंदूंच्या मंदिरात तहानलेल्यास पाणी नाकारणे व पाणी प्यायल्या बद्दल एका मुलास मारणे हेसुद्धा तितकेच हिंदूविरोधी नाही का❓ पंतप्रधान मोदी हे त्यांच्या ‘मन की बात’मधून देशातील अनेक लहान सहान घटनांना भावनिक फोडणी देत असतात. त्यांनी पाणी नाकारल्या गेलेल्या त्या लहान मुलाच्या विषयासही स्पर्श करावा. भांडण पाकिस्तानशी आहे की मुसलमानांशी? हे आधी समजून घेतले पाहिजे. हिंदू विरुद्ध मुसलमान असे झगडे करून उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, प. बंगालसारख्या राज्यांत सातत्याने निवडणुका लढविल्या जातात. हिंदू-मुसलमानांच्या खाण्यापिण्याच्या सवयी दंगलीचे कारण ठरते हे महान देशाचे लक्षण चांगले नाही. आता बाजूच्या पाकिस्तानात काय घडते आहे ?. पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदूंवर सतत हल्ले होत असतात. मंदिरे तोडली जातात. त्यामुळे हिंदूंचे पलायन सुरूच असते. आता अशी बातमी आली आहे की, पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा या प्रांतात पुरातन हिंदू मंदिरांची तोडफोड करून त्यास आग लागणाऱ्या हिंसक जमावास तेथील हिंदू समुदायाने माफ करण्याचा निर्णय घेतला. 1997 मध्ये या भागातील पुरातन मंदिरांवर हल्ला झाला. त्यात 50 संशयितांना अटक करून खटला दाखल केला. तेव्हापासून वाढलेला तणाव इतक्या वर्षांनंतरही कायम राहिला. त्यामुळे येथे अनौपचारिक होणाऱ्या ‘जिरगा’ बैठकीस दोन्ही समुदायाचे लोक एकत्र बसले. या बैठकीचे अध्यक्षस्थान त्या प्रांताचे मुख्यमंत्री “महमूद खान ” यांनी स्वीकारले. ‘जिरगा’त असे ठरले की, झाले गेले विसरून पुढे जायचे. त्या देशाच्या संविधानानुसार हिंदूंच्या अधिकाराचे रक्षण करण्याचे आश्वासन मुसलमान नेत्यांनी दिले. बैठकीत झालेल्या समझोताची प्रत सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जाईल व मंदिरांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना सोडण्याची विनंती केली जाईल. मला या ‘जिरगा’ कारवाईचे कौतुक वाटते. पाकिस्तानातला ‘जिरगा’ हिंदूंच्या मंदिरात पोहोचला नाही तरी चालेल, पण निदान दोन घोट पाणी पिणाऱ्यांना अमानुषपणे मारू नका!आपल्या देशात गंगेच्या पाण्यास अमृताचा दर्जा दिला. त्या अमृताचे जहर झाले तेव्हा गंगा शुद्धीकरणासाठी आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च केले. ते पाणी स्वच्छ होईलही, पण एका मंदिरात तहानलेल्यास पाणी नाकारले गेले. तेदेखील जेथे श्रीरामाचे मंदिर हिंदूंच्या रक्तातून उभे राहात आहे तेथे. ?? अशा भूमीत तहानलेल्यास पाणी नाकारणे हे एकप्रकारे जहरच नाही का ??. मंदिरात मुलास पाणी नाकारले व त्यास मारहाण केली तेव्हा मंदिराचा पुजारी हे उघड्या डोळ्यांनी पाहात असेल तर त्यानेही धर्मद्रोहच केला. भर तळपत्या उन्हात कुत्र्यास पाणी पाजणारे, भाकरी खाऊ घालणारे संत हिंदू धर्माचे वैभव आहे. तहानलेल्या मुलास पाणी नाकारणे हा त्या संत परंपरेचाही अपमान नाही का❓ जातीभेद आणि धर्मभेद आपल्या नसानसात आहेच, पण पाण्यासही जातीधर्माची लेबल लावले आहोत. मुसलमान मुलास पाणी नाकारले. मंदिरातील लोकांनी त्या मुलास मारले. या बातमीचे पडसाद जगभरातील मीडियात ? उमटले. बाजूच्या देशात निरपराध मुसलमानांवर कसे अत्याचार होत आहेत. त्यांना पाणीही नाकारले जाते,’ अशा बातम्या ठळकपणे पाकिस्तान, बांगलादेशच्या वृत्तपत्रांत छापल्या. युरोप, अमेरिकेतील वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली. हिंदू धर्माच्या सहिष्णुतेवरच या सगळय़ांनी प्रश्नचिन्ह उभे केले. एका बाजूला पंतप्रधान मोदी पाकिस्तानला कोविड लसीचे लाखो मोफत डोस पुरवण्याची मानवता दाखवतात, तर दुसऱया बाजूला त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले लोक मुसलमान मुलास मंदिरात पाणी नाकारतात.? हेच रामराज्य का❓देशाची संस्कृती तर अजिबात नाही, पण बोलायचे कोणी?