प्रतिनिधी-इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्याने गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे तीन विषय घेतले नसतील तरीही त्याला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेता येणार आहे. याबाबत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने(AICTE) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवं धोरण जाहीर केलं आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नव्या धोरणानुसार आता इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणं गरजेचं नाही, हे विषय आता वैकल्पिक करण्यात आले आहेत. त्यामुळे या विषयांचा अभ्यास कठीण जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोरचा मोठा अडथळा आता दूर झाला असून अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
AICTE संस्थेने १४ विषयांची यादी जाहीर केली यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांचा समावेश असेल. इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशासाठी यादीतील १४ पैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी AICTE ने एक हँडबुक जारी केलं असून त्यातही याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.